नंबर दोनचा वाद

केन्द्रीय मंत्रिमंडळात दोनच दिवसांपूर्वी बदल झाला पण या पुनर्रचनेतून क्रमांक दोनचे मंत्री कोण हा सनातन वाद मिटलाच नाही. मंत्रिमंडळात पंतप्रधानांच्या खालोखाल गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री यांचे स्थान मानले जाते. यातल्या गृहमंत्र्यांचे स्थान दुसरे असावे असा संकेत आहे. नियम नाही. या सार्या  क्रमवारीत कृषि मंत्री तसे फार खाली असतात. पण आता  शरद पवार यांनी आपल्याला दोन क्रमांकाचे स्थान मिळावे यासाठी अप्रत्यक्षपणे हट्ट धरला होता. तसा विचार केला तर ते कृषि मंत्री असले तरीही त्यांच्या इतका ज्येष्ठ आणि जाणकार मंत्री कोणीच नाही.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुशीलकुमार शिंदे यांना गृहमंत्री केले तेव्हा शरद पवार यांची भावना काय झाली असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. कारण शिंदे हे एकेकाळी स्वतःला पवारांचे चेले म्हणवुन घेत असत आणि ते पवारांच्या मानाने अनेक बाबतीत कमी आहेत. एवढेच नव्हे तर त्यांना पंतप्रधानांनी गृह खात्याची ऑफर दिली तेव्हा ते तयार नव्हते. त्यांच्या काही निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे यांना आपल्याला ही जबाबदारी पेलेल का नाही ? याबाबत शंका वाटत होती.   

असे सुशीलकुमार शिंदे हे पवारांपेक्षा वरच्या जागेवर बसले. नितीन गडकरी यांना पक्षाचे अध्यक्ष करण्यात आले तेव्हा गोपीनाथ मुंडे यांची भावना काहीशी अशीच झाली होती. पवार खरे तर पक्षात नीट राहिले असते तर आज तेच पंतप्रधान झाले असते. आता या मंत्रिमंडळात त्यांचा फार वचक आहे आणि अनेक अवघड निर्णय ते घेत असतात. त्यांच्या खात्याशी संबंधित नसलेलेही अनेक निर्णय घेताना पवारांशी चर्चा केली जात असते. मधुकरराव पिचड यांनी तर काहीशी अतिशयोक्ती करून असे म्हटले होते की, युपीएचे हे सरकार पवारच चालवत आहेत. यात बरेच तथ्य आहे. त्यामुळे पवारांना या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे स्थान असावे असे वाटले तर त्यात काही चूक नाही. पण त्यात एक अडचण आहे.  

पवार हे काही सत्ताधारी पक्षाचे नेते नाहीत. ते अत्यल्प सदस्य संख्या असलेल्या मित्र पक्षाचे नेते आहेत. तेव्हा उद्याचे पंतप्रधान किवा पंतप्रधानांनंतरचे नेते म्हणून त्यांना स्थान देता येत नाही. हे स्थान मिळवण्याची अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही इच्छा आहे. पण ते पंतप्रधान पदास इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये या पदाचे स्वप्न पाहणारांचे पंख कापण्याची रीत आहे म्हणून चिदंबरम यांना क्रमांक दोनचे स्थान नाकारण्यात आले आहे.   

अर्थात या सार्याे चर्चाच सुरू होत्या. पंतप्रधानांच्या कार्यालयाने आता मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. तिच्यात संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांचे नाव दुसर्या  क्रमांकावर आहे. पंतप्रधानांनी इराणच्या दौर्याेवर जाताना एक आदेश काढला असून आपल्या अनुपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान अँटनी भूषवितील असे जाहीर केले आहे. या आदेशाने अँटनी यांचे दुसरे स्थान आता अधिकृत झाले आहे. या यादीत शरद पवार यांचा क्रमांक तिसरा आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा  चौथा क्रमांक आहे.

गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे गृहमंत्री असूनही या पहिल्या तीनच काय पण चार क्रमांकात नाहीत. ते सभागृहाचे नेते असूनही त्यांना पहिल्या चारात स्थान देण्यात आले नाही. मग त्यांना सभागृह नेते का केले आहे याचा काही बोध होत नाही. अर्थात सुशीलकुमार शिंदे यावर काही तक्रार करणार नाहीत. कारण ते नेहमीच, पक्षाला मला खूप काही दिले आहे आणि मी समाधानी आहे असे  म्हणत असतात. तेच काय पण पी. चिदंबरम हेही काही तक्रार करणार नाहीत कारण त्यांना तक्रार करायला जागा नाही. मात्र या यादीकडे पाहिल्यावर एका गोष्टीचे नवल वाटते की तिच्यातल्या पहिल्या पाच क्रमांकातले किमान तिघे तरी कधीना कधी काँग्रेसमधून बाहेर पडले होते.

शरद पवार तर दोनदा बाहेर पडले आहेत. त्यातल्या एका प्रसंगात सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्यासोबत होते. १९७९ साली ते पवारांच्या अगदी निकट होते आणि त्यांच्या सोबत काँग्रेसमधून बाहेर पडले होते. नंतर मात्र त्यांना पवारांच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही असे लक्षात आले आणि त्यांनी पवारांची साथ सोडली. पी. चिदंबरम यांनीही एकेकाळी काँग्रेसची साथ सोडून तमिळ मनिला काँग्रेस हा पक्ष स्थापन केला होता. त्यांनी केन्द्रात  देवेगौडा आणि गुजराल यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम केले ते तमिळ मनिला काँग्रेसचे नेते म्हणूनच केले.  ते आता काँग्रेस मध्ये आहेत पण एकेकाळी ते काँग्रेस मधून फुटून निघाले होते.

पवार असोत की चिदंबरम यांनी काँग्रेसचा त्याग केला तरीही त्यांना काँग्रेसने मान दिला आहे कारण काँग्रेस पक्षात सक्षम नेतेच राहिलेले नाहीत. पक्षातून अनेक नेते गेले आणि त्यांनी आपापले पक्ष स्थापन केले. या मार्गाने पक्षातली गुणवत्ता बाहेर गेली. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना कधीही मंत्रिमंडळाचा विस्तार करताना  गुणवत्तेची आणि सक्षम खासदारांची फार गरज जाणवते.  पवार आणि चिदंबरम यांनी पक्षा सोडला असला तरीही त्यांच्या गुणवत्तेचे चीज झाल्या शिवाय राहात नाही.

Leave a Comment