नवी दिल्ली: प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्यावर वॉशिंग्टन पोस्टने चिखलफेक केल्यानंतर आता काँग्रेसचे सरचिटणीस, युवा नेते राहुल गांधी हे द इकॉनॉमिस्टच्या टीकेचे लक्ष्य बनले आहेत. राहुल गांधी हे गोंधळलेले आणि उथळ नेते आहेत; अशी टीका या वृत्तपत्राने केली आहे.
राहुल गांधींचे नेतृत्व ही काँग्रेससाठी उपलब्धी नसून समस्याच आहे; अशा आशयाचा लेख द इकॉनॉमिस्टने प्रसिद्ध केला असून त्याचे शीर्षकच ‘ द राहुल प्रॉब्लेम’ असे आहे. राहुल यांचा दृष्टिकोन काय; ते काय करू इच्छितात आणि काय करू शकतात; हे कोणालाच माहित नाही; अशी टीका या लेखात केली आहे. आपल्याकडे सत्ता आणि जबाबदारी सोपवली तर आपण काय करायचे याची जाणीव राहुल यांना स्वत:लाही नसावी; असे या लेखात म्हटले आहे.
कोणत्याही महत्वाची जबाबदारीपासून लांब राहून पक्षाच्या युवा आणि विद्यार्थी आघाडीतच रमण्याची राहुल यांची वृत्ती असून ज्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे दिली त्या राज्यात ते फारसा प्रभाव दाखवू शकले नाहीत; याकडे लेखात लक्ष वेधले आहे.
राहुल गांधींना ‘प्रमोट’ करण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. त्यांना काँग्रेसचा दुसर्या क्रमांकाचा नेता आणि अध्यक्ष सोनिया गांधींचा राजकीय वारसदार समजले जाते. मात्र राहुलना त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी सन २०१४ च्या निवडणुकीपूर्वी स्वत:चे नेतृत्व सिद्ध करावे लागेल; असे नमूद करतानाच राहुल यांच्या नेतृत्व गुणाची अद्याप कसोटी लागलेली नाही आणि त्यांना आपल्या कामाची तडफ दाखविता आलेली नाही; असेही लेखात म्हटले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू असताना सोनिया उपचारार्थ विदेशात होत्या. त्यावेळी राहुलना आपल्या नेतृवाची चुणूक दाखविण्याची संधी होती. मात्र त्यांनी त्यावेळी आंदोलनाबाबत केवळ संसदेतच वक्तव्य केले आणि ते देखील अयोग्य मार्गदर्शन ठरले; असे मत लेखात व्यक्त करण्यात आले.