एक वर्षात पंतप्रधानांची संपत्ती दुप्पट

नवी दिल्ली: पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या संपत्तीत एका वर्षात दुप्पट वाढ झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. मागच्या वर्षात मनमोहन सिंग यांच्याकडे पाच कोटी रुपयांची संपत्ती होती. यावर्षी त्यात आणखी पाच कोटीची भर पडून ती १० कोटी रुपये एवढी झाली आहे.

बँकेत असलेल्या ३ कोटी ४६ लाख रुपयांच्या ठेवी, बचत खात्यातील रक्कम यासह चंडीगड आणि दिल्ली येथील ७ कोटी २७ लाख रुपये किंमतीच्या २ सदनिका, मारुती ८०० कार, पावणे तीन लाखाचे दागिने अशी सिंग यांची संपत्ती आहे.

गेल्या वर्षी होती तेवढीच मालमत्ता पंतप्रधानांकडे असूनही त्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्यांची संपत्ती दुपटीने वाढल्याचा दावा पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.

कृषिमंत्री शरद पवार यांची संपत्ती पंतप्रधानांकडील संपत्तीच्या दुपटीहून अधिक आहे. त्यांच्याकडे २२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्थोनी सर्वात ‘गरीब’ मंत्री असून त्यांच्याकडे केवळ ५५ लाखाची मालमत्ता आहे.