विदर्भात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

यवतमाळ: कधी पाऊस झाला नाही म्हणून; तर कधी पाऊस जास्त झाला म्हणून शेतकऱ्याच्या माथ्यावरील भोग काही सरत नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी चर्चेत असलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पीक वाहून गेले आणि डोक्यावर कर्जाचे ओझे; यामुळे चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

विदर्भात यावर्षी एकूण ५३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्याने शेतातील पीक वाहून गेले. त्यामुळे कर्जबाजारी चार शेतकर्‍यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यवतमाळ जिल्ह्यात जनता दरबाराचे आयोजन केले असतानाच हा प्रकार घडला.

विदर्भात सन २००५ पासून ९ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र शासकीय अधिकारी मुख्यमंत्र्यांना खर्‍या परिस्थितीची माहिती देण्याऐवजी खोटी माहिती देऊन सुखद चित्र रंगवित असल्याचा आरोप विदर्भ संघर्ष समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. शेतकर्‍यांना अन्न सुरक्षा, आरोग्य सुविधा आणि चरितार्थासाठी इतर साधन उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मृत्यूला कवटाळण्याखेरीज अन्य पर्याय शिल्लक रहात नाही; अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment