नवी दिल्ली: लोकपालच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान टीम अण्णाचे सदस्य कुमार विश्वास यांच्यावर व्यासपीठावरून चिथावणीखोर भाषणे केल्याचा ठपका ठेऊन दिल्ली पोलिसांनी विश्वास यांना नोटीस बजावली आहे. चिथावणीखोर भाषणे न करण्याची तंबी त्यांना या नोटिशीद्वारे देण्यात आली आहे.
टीम अण्णा सदस्य कुमार विश्वास यांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस
विश्वास यांच्या भाषणामुळेच भडकून जाऊन टीम अण्णाच्या समर्थनार्थ जंतर मंतर मैदानावर जमलेल्या अण्णा समर्थकांनी शनिवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली; असा दिल्ली पोलिसांचा आक्षेप आहे. मात्र रविवारी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरही अण्णा समर्थकांनी निदर्शने केली. अशी निदर्शने लोक उत्स्फूर्तपणे करीत असून त्यासाठी कुणालाही भडकावले नसल्याचा दावा टीम अण्णाच्या वतीने करण्यात आला.
या निदर्शनांना आळा घालण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महासचिव राहुल गांधी आणि १४ केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत दिल्ली पोलिसांनी वाढ केली आहे.
