लखनौ: उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पुतळ्याची अज्ञात युवकांकडून तोडफोड करण्यात आली. या कृत्याला सत्तारूढ समाजवादी पक्षाची फूस असल्याचा बसपाचा आरोप आहे. मात्र मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या कृत्याचा निषेध केला आहे.
लखनौत मायावतींच्या पुतळ्याची तोडफोड
गौमती नगर परिसरातील आंबेडकर उद्यानात असलेल्या मायावतींच्या पुतळ्याची काही युवकांनी गुरुवारी दुपारी तोडफोड केली. या पुतळ्याजवळ मिळालेल्या चिठ्ठीत; आम्ही उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असून या पुतळ्याच्या तोडफोडीची जबाबदारी स्वीकारत आहोत; असे नमूद केलेले आढळले.
मायावती सरकारने राज्यातील आठ जिल्ह्यांचे नामांतर करण्याचा निर्णय फिरविण्याची भूमिका नुकतीच सपा सरकारने घेतली होती. यावरून उत्तर प्रदेशात तणावाचे वातावरण असतानाच घडलेल्या या घटनेने तणावात भर पडली आहे.
