अण्णा आणि टीम अण्णामध्ये विसंवादी सूर

नवी दिल्ली: टीम अण्णामधील सदस्यांमध्ये मतभेद असल्याचे आतापर्यंत अनेकदा दिसून आले आहे. जंतर मंतर येथे सुरू असलेले आंदोलनही याला अपवाद राहिलेले नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे राजधानीत सुरू असलेल्या आंदोलनाचे नेमके उद्दिष्ट काय; यातच अण्णा हजारे आणि टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य प्रशांत भूषण यांच्यात एकवाक्यता नसल्याचे आंदोलनाच्या व्यासपीठावरच दिसून आले.

लोकपाल विधेयक हा लांबचा विषय आहे. लोकपाल विधेयक संसदेत १५ भ्रष्ट मंत्र्याचा समावेश असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळानेच आणले होते. त्यामुळे या भ्रष्ट मंत्र्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी हीच या आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे प्रशांत भूषण यांनी व्यासपीठावरून सांगितले. मात्र यावेळी अण्णांनी माईक भूषण यांच्याकडून आपल्या हाती घेतला आणि सशक्त लोकपाल आल्याखेरीज भ्रष्टाचार संपणार नाही. त्यामुळे लोकपाल हीच आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टीम अण्णा आणि अण्णा यांच्यातील आणखी एका विसंवादी वक्तव्याने अण्णा समर्थक गोंधळात पडत आहेत. आंदोलन सुरू करण्यापूर्वी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य यांनी भ्रष्ट मंत्र्यांच्या यादीत प्रणव मुखर्जी यांचे नाव असल्याने ते राष्ट्रपती होणे हे या देशाचे दुर्दैव आहे; असे विधान केले होते. यावेळी अण्णाही उपस्थित होते. मात्र त्यावेळी केजरीवालांच्या विधानाला मूक संमती देणाऱ्या अण्णांनी आज मुखर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

अण्णा आणि टीम अण्णा यांच्यात विसंवादी सूर आळविले जात असल्याने भ्रष्टाचाराची चीड असलेल्या आणि अण्णांकडे अपेक्षेने डोळे लाऊन बसलेल्या सर्वसामान्य जनता आणि आंदोलनाच्या समर्थक, सहनुभूतीदारांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होत आहे.