टीम अण्णाच्या आंदोलनात एनएसयुआय कार्यकर्त्यांचा राडा

नवी दिल्ली: लोकपाल विधेयक त्वरित मंजूर करावे या मागणीसाठी टीम अण्णाने जंतर मंतर येथे सुरू केलेल्या उपोषणादरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून गोंधळ घालणारया कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती निवळली. स्वत: अण्णा या वेळी उपोषण करणार असल्याचे मंगळवारी सांगण्यात आले होते. मात्र अण्णांनी आज उपोषण न करता केवळ आंदोलन स्थळी उपस्थित राहून मागण्या मान्य न झाल्यास दि. २८ पासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

लोकपाल विधेयक त्वरित संमत करावे, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १५ मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी उच्चाधिकार समिती स्थापन करावी, खासदारांवरील खटले वेगाने निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रेक न्यायालय स्थापन करावे आणि पक्षप्रमुखांवरील आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नियुक्त करावे या मागणीसाठी टीम अण्णाचे ज्येष्ठ सदस्य बुधवारी जंतर मंतरवर उपोषणाला बसले. सकाळपासूनच त्यांच्या पाठीराख्यांनी मैदानावर गर्दी केली. सर्वत्र तिरंगी झेंडे फडकावून भ्रष्टाचार, केंद्र सरकार यांच्या निषेधाच्या आणि लोकपालाच्या मागणीच्या घोषणा दिल्या जात होत्या.

हे आंदोलन सुरू असतानाच एनएसयुआय या काँग्रेसच्या विध्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आंदोलनाच्या ठिकाणी घुसले आणि त्यांनी राडा करून हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी टीम अण्णाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हातापायी होण्याची भीती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलन उधळण्याचा प्रयत्न करणारया कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.