जागतिक कीर्तीचे नेते काय खातात किवा त्यांना काय आवडते आणि काय आवडत नाही याविषयी सर्वसामान्यांना कांही माहिती असणे असंभवनीयच आहे. मात्र अशी माहिती खात्रीने मिळण्याचे ठिकाण म्हणजे या नेत्यांचे स्वयंपाकी किवा आधुनिक भाषेत कुक. नेत्यांच्या खाण्यापिण्याचा आवडी हे शेफ जसे सांभाळतात तसेच त्यांनी बनविलेल्या स्वादिष्ट भोजनामुळे देशादेशांतील संबंध मधुर होण्यासही बरेचवेळा सहाय्य मिळते. अशा या शेफचे पॅरिसमध्ये नुकतेच एक संमेलन पार पडले. या संमेलनात त्यांनी आपापसात माहितीची जशी देवाणघेवाण केली तसेच खास रेसिपीजही शेअर केल्या. डिनर पार्टी डिप्लोमसी बद्दल एकमेकांना खास टिप्सही दिल्या असे समजते.
फ्रान्समधील उद्योगपती गिल्स बॅग्रॉड याने अशा खास शेफसाठी एक क्लब सुरू केला आहे. जगभराच्या अनेक देशांचे अध्यक्ष व कांही देशांचे राजे रजवाडे यांचे शेफ या कलबचे सदस्य आहेत. १९७७ ला हा क्लब सुरू झाला. राजकारण देशादेशांचे संबंध कदाचित बिघडवते पण जेवणाचे टेबल मात्र सर्वांना एकत्र आणते असे गिल्सचे म्हणणे आहे. तो म्हणतो, अध्यक्ष, पंतप्रधान काय येतात, जातात. पण शेफ मात्र कायम असतात. ला क्लब डेस शेफस डेस शेफ्स असे या क्लबचे नामकरण करण्यात आले असून त्याचा अर्थ आहे, शेफ आणि नेते सारखेच असतात.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील शेफ क्रिस्टेटा कॉमरफोर्ड हा बराच अनुभवी असून त्याने आत्तापर्यंत बिल किलंटन, जॉर्ज बुश व आता बराक ओबामा यांची सेवा केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार बराक ओबामा यांना बीट अजिबात आवडत नाही. फ्रेन्च शेफ बेनॉर्ड याने गेली चाळीस वर्षे अनेक फ्रेन्च अध्यक्षांची क्षुधा तृप्त केली आहे. जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल या जर्मनीच्या नेत्या असल्या तरी त्यांचे पॅरिसवर सतत बारीक लक्ष असते. कारण त्यांना फ्रेन्च खाद्यपदार्थ अतोनात आवडतात. या बहुतेक सर्व नेत्यांचा आपल्या शेफवर विश्वास असतो आणि जगभरातील बहुतेक नेते त्यामुळेच आपली पोटे या शेफवर सोपवून अगदी निर्धास्त असतात. अपवाद फक्त रशियाचा. कारण येथे आजही पंतप्रधान अथवा अध्यक्षांचे जेवण त्यात विष मिसळले गेलेले नाही ना हे तपासणारे फूट टेस्टर असतात. हे टेस्टर सुरवातीला हे खाद्यपदार्थ स्वतःच खातात आणि काही वेळानंतर मगच ते अध्यक्ष अथवा पंतप्रधानांना वाढले जातात असेही समजते.