कलमाडींच्या लंडन वारीला न्यायालयाचा चाप

नवी दिल्ली: राष्ट्रकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश कलमाडी यांच्या सहभागाने देशाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्याची टिप्पणी करीत दिल्ली उच्च न्यायालयाने कलमाडी यांच्या लंडन ऑलिम्पिक वारीला चाप लावला आहे. कलमाडी दि. २७ जुलैपर्यंत देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत; असे आदेश न्यायालयाने दिले.

दिल्ली येथील एड. राहुल मेहेरा यांनी कलमाडींना लंडनला जाण्यापासून रोखण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेचा निकाल मंगळवारी राखून ठेवण्यात आला होता. तो बुधवारी न्या. ए.के.सिक्री आणि न्या.राजीव सहाय यांच्या खंडपीठाने जाहीर केला.

कलमाडी हे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन सोहोळ्याला उपस्थित राहणार नाहीत. आशियाई एथलिट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे; असा युक्तिवाद कलमाडी यांचे वकील एड. मुकुल रोहतगी यांनी केला होता.

देशाच्या प्रतिष्ठेपुढे कुणाचीही प्रतिष्ठा महत्वाची नाही. कलमाडी यांच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्याने देशाच्या प्रतिष्ठेला बाधा येऊ शकते; असे न्यायालयाने निकालात स्पष्टपणे नमूद केले आहे.