शरद पवार देणार मंत्रिपदाचा राजीनामा?

नवी दिल्ली, दि. २० – राष्ट्रपतीपदाच्या मतदानानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर सोशल नेटवर्किंग साइटस ट्विटर आणि टीव्ही न्यूज चॅनल्सवर ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडणार असल्याचे वृत्त येत आहे.

प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी दिल्यानंतर पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात नंबर दोनचे पद दिले जाईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि पवारांना अपेक्षित होते. मात्र, कॉंग्रेसकडून अनौपचारिकरित्या ए.के.अँटनी यांच्या गळ्यात दोन नंबरच्या पदाची माळ घालण्यात आली. यामुळे शरद पवार केंद्र सरकार आणि कॉंग्रेसवर नाराज झाले आहेत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉंग्रेसचा निषेध करण्यासाठीच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. याआधी उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर केंद्रात राजकीय नाट्य सुरू झाले होते. यावेळीच अँटोनी यांना क्रमांक दोनचे पद देण्यात आले आणि शरद पवार नाराज झाले.

गुरुवारी संध्याकाळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पवार आणि पटेल अनुपस्थित होते. या आधी उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी झालेल्या बैठकीत शरद पवार अनुपस्थित होते.

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचे नाव युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर त्यांनी कॅबिनेटमधून राजीनामा दिला होता. कॅबिनेटमध्ये मुखर्जी यांचे स्थान पंतप्रधानांनंतर दुसर्‍या क्रमांकाचे होते. पंतप्रधानांच्या शेजारी ते बसत असत. मात्र, मुखर्जी यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठतेनुसार आपल्याला पंतप्रधानांच्या शेजारचे, दुसर्‍या क्रमांकाचे आसन देण्यात यावे, अशी शरद पवार यांची अपेक्षा होती. मात्र, कॉंग्रेसने पंतप्रधानांच्या शेजारचे स्थान केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांना दिले आहे. पवारांच्या या अपमानाचा निषेध करत राष्ट्रवादीचे दोन्ही कॅबिनेट मंत्री गेल्या दोन कॅबिनेटमध्ये अनुपस्थित राहत आहेत. आता पवार आणि पटेल या दोघांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.