यू.एस. राष्ट्राध्यक्ष ओबामा आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांची चर्चा

नवी दिल्ली/ वॉशिंग्टन दि.१५- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी परस्पर हितसंबंधाबाबत नुकतीच फोनवरून चर्चा केली असल्याचे समजते. यात मुख्यत्वे जागतिक अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी करण्याचे प्रयत्न यावरच भर होता.युरोझोनमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगातून बाहेर पडण्यासाठी योजावयाचे उपाय यावरही चर्चा करण्यात आली.

मेक्सिको येथील लॉस काबॉज येथे जून १८ पासून सुरू होत असलेल्या जी-२० शिखर परिषदेत युरोप पेचप्रसंगावरच प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. कारण युरोझोनचा परिणाम चीन आणि भारताचा विकासदर कमी होण्यावर होत आहे. परिणामी जागतिक अर्थव्यवस्थेसमोरही संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट हिलरी क्लिंटन आणि भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.एम.कृष्णा यांच्यात नुकत्याच झालेल्या चर्चेनंतर ओबामा आणि मनमोहनसिंग यांच्यात फोनवरून बातचीत झाली आहे.

सोमवारीच अमेरिकेने भारतासह अन्य सहा देशांवर इराणकडून तेल खरेदी बंदीचे आदेश मागे घेतले आहेत.

Leave a Comment