
नवी दिल्ली दि.१५- स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसा परत आणणे आणि त्यासंबंधातील तपशीलाबाबत केंद्राने संसदेत मांडलेल्या श्वेतपत्रिकेबाबत शंका निर्माण होईल अशी परिस्थिती स्वीस राष्ट्रीय बँकेने नुकत्याच जारी केलेल्या अहवालातून निर्माण झाली आहे. केंद्राने श्वेतपत्रिकेत २००६ ते १० या काळात स्वीस बँकांतील भारतीय गुंतवणूक १४ हजार कोटींनी मंदावली असल्याचे जाहीर केले होते. मात्र बँकेच्या अहवालानुसार २०११ सालात भारतीयांची स्वीस बँकांतील गुंतवणूक १२ हजार ७४० कोटींवर गेली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षात इतकी मोठी गुंतवणूक वाढ प्रथमच झाल्याचेही या अहवालात म्हणण्यात आले असले तरी या गुंतवणुकीत अन्य लोकांच्या नांवे केलेल्या गुंतवणुकीचा समावेश नाही आणि ही अशी त्रयस्थ गुंतवणूक सुमारे २० ते २५ बिलीयन डॉलर्स असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
