नवी दिल्ली दि.२३- युपीए सरकारच्या कालच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्ताने झालेल्या भोजन समारंभात समाजवादीचे सुप्रिमो मुलायमसिंग यांना सोनिया गांधींच्या टेबलावर जागा देण्यात आल्याने अनेक तर्कविर्तकांना उधाण आले असतानाच मुलायमसिंगांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत काँग्रेसबरोबर राहण्याचे जाहीर केले आहे. यामुळे आता काँग्रेस ममतांना डच्चू देईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अर्थात मुलायमसिंग यांनी सरकारात सामील होण्याबाबत अजून कांहीही स्पष्ट निर्णय जाहीर केलेला नाही व राजकीय तज्ञांच्या मते राष्ट्रपती निवडणुकीनंतरच याबाबतची भूमिका मुलायमसिंग स्पष्ट करतील. मुलायमसिंगांच्या पाठींब्यामुळे काँग्रेसची ताकद मात्र नककीच वाढली आहे. ममतांच्या सततच्या दादागिरीने हैराण झालेल्या काँग्रेसला कोणीतरी भक्कम पाठिराखा हवाच होता व तो मुलायमंसंगाच्या रूपाने मिळणार असेल तर त्यासारखी चांगली बाब दुसरी नाही.
अर्थात काँग्रेसमधील वरीष्ठ मंडळी ममतांना डच्चू दिला जाणार नाही असे एकीकडे सांगत आहेत तर दुसरीकडे सुधारणावादी निर्णय घेताना ममतांपेक्षा मुलायमसिंग अधिक लवचिक असल्याचेही कौतुक करत आहेत. ममता स्वतःहून गेल्या तर ते कॉग्रेससाठी अधिक चांगले होणार आहे असेही सुतोवाच केले जात आहे. असे घडले तर मात्र ती २००८ सालची पुनरावृत्ती ठरणार आहे. त्यावेळीही इंडो अमेरिकन नागरी अणु कराराबाबत डाव्यांनी काँग्रेसची साथ सोडली होती तेव्हा समाजवादीने मात्र अविश्वास ठरावाच्या वेळी काँग्रेसची पाठराखण केली होती.
आत्ताही यूपीएच्या तिसर्या वर्धापनदिन समारंभात मुलायमसिंग यांना पंतप्रधान मनमोहनसिंग व कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जवळ जागा देण्यात आली होतीच पण जेवणाच्या वेळीही ते सोनिया गांधी यांच्या समवेतच होते. काँग्रेसच्या परंपरेप्रमाणे हा मान फक्त जवळच्या व्यक्तींनाच देण्यात येतो. यावरूनच पुढील तर्कविर्तक लढविले जात आहेत.