एअर इंडियाच्या आंदोलनामुळे आंबा निर्यातीला फटका

मुंबई, दि. २३ – एअर इंडियातील वैमानिकांच्या आंदोलनाचा फटका आंबा निर्यातीला बसला असून, दररोज २०० ते २१५ टन होणारी आंब्याची निर्यात १०० टनांनी घसरली आहे. अन्य विमान कंपन्या अव्वाच्या सव्वा भाव आकारत असल्यामुळे आंबा निर्यात करणे मुश्कील झाले असून, शेतकरी व व्यापारी वर्गाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे.

युरोप, अमेरिका, दुबई, मलेशिया, सिंगापूर आदी देशांत हापूस आंब्याची दररोज २०० ते २५० टन निर्यात केली जाते. तसेच हा आंबा जहाजानेही पाठविला जातो. इतर विमान कंपन्यांच्या तुलनेत एअर इंडियाचे दर कमी असल्याने एअर इंडियाच्या विमानांनी दरवर्षी आंब्याची निर्यात होत असते. मात्र गेले काही दिवस एअर इंडियाच्या वैमानिकांनी संप पुकारल्यामुळे कोट्यवधी रूपयांचा आंबा निर्यातीवाचून पडून आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवडयापासून जूनपर्यंत आंबा निर्यात सुरू असते. यावर्षी आंबा उशिरा आल्याने आणि त्यातच एअर इंडियाचे आंदोलन चालू असल्याने त्याचा आंबा निर्यातीला फटका बसला आहे. आंबा निर्यातीत एक लाख डॉलरचे नुकसान होत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले. सध्या दररोज मार्केटमध्ये ९० हजार आंब्याच्या पेट्या येत आहेत. मात्र माल जास्त व मागणी घटल्याने आंब्याचे दर खाली आले आहेत. ८०० ते २००० रूपये डझनने विकला जाणारा हापूस आंबा आता ३०० ते ५०० रूपयांना मिळत आहे. यामुळे शेतकरी व व्यापारी वर्गाचे नुकसान होत आहे. पण सामान्य ग्राहकांना मात्र हायसे वाटत आहे.

Leave a Comment