सुझुकीची ‘हायाते’ बाजारात

मुंबई, दि. २३ – दुचाकी निर्मिती करणार्‍या सुझुकी मोटरसायकलने ‘हायाते’ ही ११२ सीसीची मोटर सायकल नुकतीच बाजारात आणली आहे. १०० ते १३० सीसीच्या मोटरसायकल बाजारपेठेत या नव्या मोटरसायकलला चांगली मागणी मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. ‘हायाते’ मोटरसायकलसाठी कंपनीने ५०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून, हरियाणातील रोहतक प्रकल्पात ‘हायाते’ चे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पातून दरवर्षी ३.६ लाख मोटरसायकलींचे उत्पादन होईल, असे कंपनीचे विक्री प्रमुख आनंद ठाकूर यांनी सांगितले. सुझुकी येत्या दोन वर्षांत आणखी सहा नवीन मोटरसायकली बाजारात आणणार आहे. हायातेच्या जाहिरातीसाठी अभिनेता सलमान खान याला कंपनीने करारबद्ध केले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.