ग्लोबल पागोडय़ाला सुरक्षेचे कवच

pagoda
मुंबई – भारतातील धार्मिक स्थळे ही नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिली आहेत. धार्मिक स्थळांना लक्ष्य करून दंगली घडवून आणणे दहशतवाद्यांचे उद्दीष्ट राहिले आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात जगभरातील बौद्ध बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या बिहारच्या महाबोधी मंदीर आणि परिसरता एकामागून एक 9 स्फोट घडविण्यात आले होते. अशी वेळ मुंबईतील प्रख्यात ग्लोबल विपश्यना पागोडय़ावर येऊ नये यादृष्टीने सदर पागोडय़ाच्या प्रशासनाने सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या. प्रशासनाच्या या प्रयत्नांना यश आले असून या पागोडय़ाला आता हायटेक सीसीटीव्हींचे सुरक्षा कवच बसविण्यात आले आहे. सदर सीसीटीव्ही ‘झायकॉम’ या कंपनीतर्फे पुरविण्यात आले आहेत.

संपूर्ण पागोडय़ाला 65 हायडेफीनेशन पॅमेरे बसविण्यात आले आहेत. या पॅमेऱयांमध्ये फेस रेगनिशनचीसुद्धा सुविधा आहे. तसेच या ठिकाणी एक छोटेखानी कंट्रोल रुमही बांधण्यात आले आहे. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे काम या कंट्रोल रुमद्वारे केले जाईल. उत्तर मुंबई येथील गोराई बीच जवळ हा पागोडा आहे. सदर वास्तूची रचना फार वेगळ्या पद्धतीने करण्यात आली असून मुंबईतील आठवे आश्चर्य म्हणून याची ओळख आहे. 16 एकर जमिनीवर बांधण्यात आलेल्या या पागोडय़ाची उंची 325 फूट आहे. या ठिकाणी 8 हजार जण एकाच वेळी बसून ध्यान करू शकतात. या पागोडय़ाचा घुमट हा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. तसेच या घुमटाचे बांधकाम हे भूकंप निरोधक आहे.