
नेदरलँडची ना नफा तत्वावर काम करणारी कंपनी मार्स वन ने त्यांच्या मंगळावरच्या एकतर्फी प्रवासासाठी ७०५ जणांची निवड केली असून त्यात ४४ भारतीयांचा समावेश आहे. निवड झालेल्या भारतीयांत २७ पुरूष आणि १७ महिलांचा समावेश आहे. २०२४ साली हे मिशन सुरू होणार आहे. त्यासाठी जगभरातील नागरिकांकडून अर्ज मागविले गेले होते आणि दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील १०५८ उमेदवारांची निवड करण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्या अंतिम निवडीत ३५३ जणांना अपात्र ठरविले गेले आहे व ७०५ जणांची निवड केली गेली आहे.
मार्स वन मिशनसाठी ४४ भारतीयांची निवड
या ट्रीपसाठी २० हजारांपेक्षा अधिक भारतीयांनी नांवे दिली होती. त्यात पुणे, मुंबई, दिल्ली, हैद्राबाद, कोलकाता, थिरूवनंतपुरम अशा अनेक शहरातील नागरिकांचा सहभाग होता. १४० देशांतील नागरिकांनी या मिशनसाठी नांवे नोंदविली होती. मात्र निवडलेल्या लोकांची बुद्धीमत्ता, ज्ञान, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, व्यक्तीमत्त्व यांच्या चाचण्या घेऊन त्यात उत्तीर्ण झालेल्यांचे मेडिकल अहवाल मागविले गेले होते. या लोकांनी मार्च २०१४ पर्यंत त्यांचे वैद्यकीय रिपोर्ट आणि त्यांनी या मिशनसाठी भरलेल्या प्रोफाईल पब्लिकसाठी ओपन करणे अशा अटींची पूर्तता करावयाची होती. ४१८ पुरूष आणि २८७ महिलांनी या दोन्ही अटी पूर्ण केल्या त्यांची निवड करण्यात आली.
