
प्रत्येक गोलंदाजाला कमीत कमी धावा द्यायच्या असतात, मग फॉरमॅट कोणताही असो. क्रिकेटमध्ये मेडन ओव्हर टाकणे ही मोठी गोष्ट आहे. मेडन ओव्हर म्हणजे षटकात एकही धाव नाही, सहा पैकी सहा चेंडू निर्धाव असतात. पण एक गोलंदाज असा होता, ज्याने सलग 21 मेडन ओव्हर्स टाकली. हा गोलंदाज होता भारताचा आणि नाव होते बापू नाडकर्णी. नाडकर्णी यांनी याच दिवशी हे काम केले होते. 1964 मध्ये, त्यांनी इंग्लंड विरुद्ध मद्रास आताचे चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सलग 21 मेडन षटके टाकली होती. त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला सलग इतकी मेडन षटके टाकता आलेली नाहीत.
सलग 21 मेडन ओव्हर टाकून भारतीय फिरकीपटूने रचला इतिहास
या सामन्यात भारताने पहिला डाव 7 गडी गमावून 457 धावांवर घोषित केला. हा सामना 10 जानेवारीला सुरू झाला आणि इंग्लंड 11 जानेवारीला फलंदाजीला आला. त्याच दिवशी बापू नाडकर्णीने चेंडू हातात घेतल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले होते.
बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडच्या पहिल्या डावात फलंदाजांना धावा करू दिल्या नाहीत. लागोपाठ 21 मेडन षटके टाकली. पण इतकी किफायतशीर गोलंदाजी करूनही त्यांचे हात रिकामेच राहिले. म्हणजे त्यांना एकही विकेट मिळाली नाही. बापू नाडकर्णी यांनी 32 षटके टाकली आणि फक्त पाच धावा दिल्या. यामध्ये त्याने एकूण 27 मेडन ओव्हर्स टाकल्या. त्यांची इकोनॉमी फक्त 0.15 होती. बापू नाडकर्णी हे त्यांच्या तंग रेषेसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी फलंदाजांना धावा करण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या डावात त्यांनी शानदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात बापू नाडकर्णींनी सहा षटके आणि चार मेडन षटके टाकली. मात्र, या डावात त्यांनी विकेट्स मिळवल्या. त्यांनी सहा धावांत दोन गडी बाद केले. सलग मेडन टाकण्याचा त्यांचा विक्रम आजतागायत मोडता आलेला नाही.
पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारून आणि इंग्लंडला पहिल्या डावात कमी धावसंख्येवर रोखूनही भारताला हा सामना जिंकता आला नाही. सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडने पहिल्या डावात 317 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात टीम इंडियाने 140 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी फारशी यशस्वी ठरली नाही. भारताने आपला दुसरा डाव नऊ गडी गमावून 152 धावांवर घोषित केला. इंग्लंडने 241 धावा केल्या आणि पाच विकेट्स गमावून सामना अनिर्णित राहिला.
