32 हजार कोटी एलआयसीचे प्रिमियम उत्पन्न

नवी दिल्ली – भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) ने आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 31968.92 कोटी रुपये प्रिमियमच्या माध्यमातून कमविले आहेत. परंतु, ही  प्रीमियम किंमत कंपनीच्या लक्ष्य़ापेक्षा कमीच आहे. कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीच्या आर्थिक वर्षात (2012-13) एकूण 29159.75 कोटी रुपये प्रिमियमच्या स्वरुपात कंपनीला प्राप्त झाले होते. 2013-14 च्या आर्थिक वर्षात यामध्ये केवळ 9.63 टक्के वाढ झाली आहे.

कंपनीने या आर्थिक वर्षात 33,000 कोटी रुपये एवढे लक्ष्य़ ठेवले होते. मुख्य म्हणजे जानेवारी 2014 मध्ये नवीन पॉलिसी दाखल झाल्यामुळे विमा कंपन्यांना यांची योग्य जाहिरात करण्यास वेळ मिळालेला नाही. एलआयसीने विमा उद्योगात प्रिमियमच्या रुपात चांगली वाढ केली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 कंपनीने एकूण 3.44 कोटी विमा पॉलिसी विक्री केल्या होत्या. यापूर्वी कंपनीने एकूण 3.67 कोटी विमा पॉलिसी विक्री केल्या होत्या.

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2013 पर्यंत एलआयसीने योग्य प्रिमियम  उत्पन्न मिळविले होते. परंतु, जानेवारी आणि मार्च महिन्या दरम्यान सरासरी प्रिमियम  मिळवता आले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे  कंपनीने जानेवारी महिन्यात नवीन पॉलिसी दाखल केल्या होत्या. कंपनी आपल्या एजंट आणि कार्यालयांच्या मदतीने पॉलिसी विक्री करते. एलआयसीचे देशात 12 लाख एजंट असून कंपनीचा बिझनेस वाढविण्यात यामुळेच मदत होते.