सेऊल – दक्षिण कोरियात समुद्रात एक बोट उलटल्याने 293 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी दक्षिण कोरियन नौदलाच्या विशिष्ट जवानांना पाठविण्यात आले आहे. या नौकेत चालक दलाच्या सदस्यांसह 459 लोक सवार होते. सवार लोकांमध्ये माध्यमिक शाळेचे विद्यार्थी होते जे एका बेटावर सुटी घालविण्यासाठी जात होते. या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी मिळाली आहे. ज्यात एक विद्यार्थी आणि चालक दलाच्या एका महिला सदस्याचा समावेश आहे. बोट दक्षिण द्वीप ब्यूंगपूणगपासून 20 किलोमीटर अंतरावर बुडाली आहे. सरकारने या आधी 368 प्रवाशांना वाचविण्यात आल्याची सूचना मागे घेतली आहे आणि आतापर्यंत फक्त 164 लोकांना वाचविण्यात आल्याचे म्हटले आहे.
उर्वरित 293 प्रवासी बेपत्ता आहेत, असे संरक्षण आणि लोकप्रशासन उपमंत्री ली गयेओंग-ओग यांनी सांगितले. 6825 टन वजनी नौका आपत्तीत फसल्याचा संदेश दिल्यानंतर 2 तासातच बुडाली. वाचविण्यात आलेल्या लोकांच्या अधिक संख्या सांगण्याचे कारण अनेक सूत्रांकडून येणारी माहिती होती ज्यामुळे गोंधळाची स्थिती बनली असे ली यांनी म्हटले.
नौकेवर 459 लोक सवार होते जे दक्षिण द्वीप जेजूच्या रिसॉर्टकडे जात होते. यात दक्षिण सेऊलच्या आन्सॅन मधील एका शाळेचे विद्याथीं होते जे आपल्या शिक्षकांसमवेत प्रवास करत होते. अनेक प्रवाशांना मच्छिमारी करणाऱया नौका आणि व्यावसायिक जहाजांनी वाचविले जे सर्वात आधी घटनास्थळी पोहोचले होते. यानंतर कोस्ट गार्ड आणि नौदलाचे जहाज हेलिकॉप्टरसह घटनास्थळी पोहोचले. दक्षिण कोरियाच्या नौदलाच्या सीलचे जवान बुडालेल्या नौकेचा शोध घेत आहेत. समुद्रातील पाण्यात गाळ खूप असल्याने बचाव कार्यात अडचणी येत असल्याचे ली यांनी सांगितले.