नाशिक – राजकारणात ‘बेरजेच्या समीकरणा’साठी कोण काय करेल, याचा नेम नसतो. सध्या नाशकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्याचाच प्रत्यय येत आहे. गुजराती मतदाराना आकर्षित करण्यासाठी मनसेने ‘नमो’चा जप सुरु केला आहे. उमेदवाराच्या प्रचार पत्रकावर चक्क भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरून भाजप -सेनेच्या गोटात खळबळ उडवून दिली आहे .
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी कान टोचल्यानंतरही मनसेने नमो नमोचा जप सुरुच ठेवला आहे . गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी गुजराती भाषेत प्रचार पत्रक प्रसिद्ध करण्यात आली आहेत . त्यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आल्याने शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.शिवाय भाजपच्या पदाधिकार्यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी लावून धरली आहे. शिवसेना – भारतीय जनता पार्टीच्या पारंपारिक गुजराती मतदाराना आकर्षित करण्यासाठी मनसेने डाव रचला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना करत आहे.