‘सोशल नेट्वर्किंग ‘वर मोदींचाच ‘कब्जा’

मुंबई –  लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघा एकच दिवस राहिला असल्याने राजकीय पक्ष ‘रात्र वैऱ्या’ची धर्तीवर आप-आपल्या मतदारसंघात कामाला लागले आहेत. यंदा राजकीय पक्षांसाठी सोशल नेट्वर्किंग हे एक प्रचारासाठी आधारवड ठरले आहे. साहजिकच त्यात अग्रेसर कोण ?हा प्रश्न असला तरी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनीच बाजी मारली आहे.  

लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदारांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्या देशभरात `अब की बार मोदी सरकार`चा फिव्हर चांगलाच चढला आहे. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचाच बोलबाला पाहायला मिळत आहे . ट्विटरवर मोदींचे जवळपास ३७ लाख फोलोअर्स आहेत यावरूनच त्यांची क्रेझ पाहायला मिळत आहे . तर काँग्रेस नेते शशी थरुर यांचा  दुसरा क्रमांक लागतो. त्यांचे २१ लाख फॉलोअर्स आहेत. 

आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनीही या रेसमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे. यावर्षी त्यांच्या फॉलोअर्समध्ये ३ लाख २९ हजारांनी वाढ झाली आहे. त्यांचे एकूण १० लाख फॉलोअर्स आहेत.फेसबुकवरही मोदींचाच बोलबाला सुरु आहे. त्यांचे देशातील समर्थक स्थानिक पातळीवरील प्रश्न असो राजकीय स्थिती यावर सतत टिपण्णी करीत आहेत, त्यामुळे प्रतिक्रियांचे ‘युद्ध’ वाढले आहे. अन्य पक्षांचे युजर्स घसरले तरी भाजपला मानणारे युजर्स संयमाने उत्तरे देताना आढळत आहे. त्यामुळे फेसबुकवरही मोदींचे साम्राज्य पहावयास मिळत आहे.

Leave a Comment