केसरकर शिवसेनेच्या ‘वाटे’वर ?;राणेंची कोंडी कायम

सिंधुदुर्ग कॉंग्रेसचे शक्तिमान नेते नारायण राणे यांच्याविरोधात दंड थोपटून त्यांचे चिरंजीव निलेश राणे यांच्या प्रचारावर बहिष्कार घालताना राष्ट्रवादीलाही न जुमानणाऱ्या आमदार दीपक  केसरकर यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आल्याने शिवसेनेची शक्ती वाढणार असल्याचे बोलले जात आहे, त्यात खुद्द केसरकर यांनी शिवसेनेशी संपर्क साधल्याची चर्चा आहे .  परिणामी आघाडी धर्म पाळण्यासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेस पर्यायाने राणे पिता-पुत्रांना दिलासा दिला असला तरी राणे पिता-पुत्रांची कोंडी कायम आहे. 

दरम्यान, दिपक केसरकर आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला मतदान करण्याचा निर्णय केसरकर आणि पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. राष्ट्रवादीच्या या नाराज कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शिवसेनेला पाठींबा दिल्यास राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.  दीपक केसरकर यांनी  नीलेश राणे यांचा प्रचार करण्यास नकार दिल्याने मागील काही दिवसांपासून सिंधुदुर्गात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला. 

कार्याध्यक्ष  आव्हाड यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साहेबांचे आदेश न पाळल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र केसरकर हे  त्यांच्या भूमिकेवर ठाम होते .  त्यात कॉंग्रेसभवनात आघाडीच्या बैठकीत या विषयावरून राडा झाला.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खुद्द शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेतली . त्यानंतर सभेत देशाचा प्रश्न असताना स्थानिक पातळीवर आमच्यातील काहीना अवदसा आठवली अशी टीका केसरकर यांना उद्देशून केली होती.  केसरकर यांची रविवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.  

केसरकर यांच्यावर पक्षाने केलेल्या कारवाईनंतर त्यांची पुढची दिशा काय असेल याबद्दल राजकीय वर्तुळात   अनेक चर्चा सुरु असून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. केसरकर हे शिवसेनेच्या संपर्कात असून त्यांनी काल गोव्यात शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. केसरकर शिवसेनेत जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.केसरकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी -कार्यकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कॉंग्रेस पर्यायाने राणेंची कोंडी आणखी वाढली आहे ,’त्यांनी’ सेनेला जवळ केले तर डोकेदुखी होणार अशी चर्चा कॉंग्रेसच्या वर्तुळात आहे.

Leave a Comment