मुंबई – मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत असली तरी सोशल मिडीयावरही मतदारांना साद घालण्यात येतआहे पण मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्याने त्याची धास्ती राजकीय पक्षांना राहणार आहे मात्र मतदान हे श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य घेवून मत द्या ,वैद्यकीय उपचारात सवलत घ्या अशी अभिनव योजना इंडियन मेडिकल असोसिएशन राबविणार आहे.
लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या डॉक्टरांच्या संघटनेनेही अधिक मतदान होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मतदान केल्याची बोटावरील शाई दाखवल्यास रुग्णांना बाह्यरुग्ण विभागात एक आठवडा उपचारावर २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय ‘आयएमए’ने घेतला आहे. अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविला जाणार आहे .
मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने कित्येक जण हा दिवस मौजमजा करण्यासाठी घालवतात. अनेक जण धावपळीच्या आयुष्यातून एक दिवस विश्रांतीचा म्हणून थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी सहकुटुंब जातात. परिणामी, मतदानाचा टक्का घटतो त्यामुळे मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आयएमएनेही पुढाकार घेतला आहे. मुंबईत आयएमएचे सदस्य असलेले १० हजार डॉक्टर आहेत. त्यांना अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत.