मुलायम, आझमी शरम करो

मुंबईच्या शक्ती मिल कंपाऊंडमधील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यायला नको असे मत व्यक्त करून मुलायमसिंग यादव यांनी आपण कोणत्याही गोष्टीचे राजकारण कसे करू शकतो हे दाखवून दिले आहे. यांचा पूर्ण देशात धिक्कार केला जात आहे. कारण गेल्या वर्ष-दोन वर्षात बलात्काराच्या आणि सामूहिक बलात्काराच्या समोर येत असलेल्या एकेका प्रकरणामुळे जनता चिडली असून अशा लोकांना फाशीच दिली पाहिजे असा आवाज उठवला जात आहे. मुलायमसिंग यांना मात्र एखाद्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्‍या या गुन्ह्याकडे पोराठोरांची किरकोळ चूक म्हणून पहावे असे वाटते. केली असेल मुलांनी चूक त्याला एकदम फाशीच कशाला असा त्यांचा विचार आहे. 

मुलायमसिंग यादव हे स्वतः काही पोराठोरांत जमा नाहीत. आपण काय बोलत आहोत याचे भान असावे एवढे ते मोठे आहेत. तेव्हा त्यांनी भावनेच्या भरात किंवा गफलतीने ही अनाहूत सहानुभूती या मुलांना दाखवली आहे असे संभवत नाही. कदाचित कोणाचा विश्‍वास बसणार नाही पण या मागे मतांचे एक राजकारण आहे आणि याच राजकारणातून त्यांच्या पक्षाचे नेते आझम खान हेही गेल्या दोन-तीन दिवसांपासून जातीय विष पसरवणारे उद्गार जाणीवपूर्वक काढत आहेत. १९८० च्या दशकामध्ये फुलनदेवी नावाची एक महिला दरोडेखोर गाजली होती. तिचा नंतर तिच्याच घरच्या लोकांनी खून केला. परंतु अनेकांची हत्या करूनसुध्दा तिने शरणागती स्वीकारली होती. म्हणून तिला शिक्षा झाली नाही. तिच्या शरणागतीचा हा प्रकार संपताच मुलायमसिंग यादव यांनी तिला आपल्या समाजवादी पार्टीत निमंत्रण देऊन बोलावले आणि तिला खासदार म्हणून निवडूनसुध्दा आणले. 

ती लोकांनी भरभरून मतदान केल्यामुळे निवडून आली. याचा अर्थ ती गुन्हेगार असली तरी तिला लोकांची सहानुभूती होती. आपल्या समाजामध्ये असा एक वर्ग आहे की ज्यांना अशा गुन्हेगारांविषयी सहानुभूतीच वाटते. मुख्तार अन्सारी हा कुप्रसिध्द गुन्हेगारी प्रवृत्तीचा नेता आहे. त्याच्यावर बलात्कार, दरोडे असे अनेक गुन्हे आहेत आणि तो आता तुरुंगात आहे. एवढे असूनही समाजाचा एक वर्ग त्याला मतदान करतो. ही काय मनःस्थिती आहे हे जाणून घेतले पाहिजे. या लोकांना असे वाटते की समाजातल्या वरच्या वर्गातले लोकही गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात. या प्रवृत्तीतून ते अब्जावधी रुपये मिळवतात आणि प्रतिष्ठा प्राप्त करतात. त्यांना मात्र अशा कठोर शिक्षा होत नाहीत. गरिबांना मात्र ताबडतोब शिक्षा होतात. बड्या प्रतिष्ठीत गुन्हेगारांना लगेच जामीनही मिळतो आणि तो तर चित्रपट अभिनेता असेल तर त्याला वारंवार सुट्टीसुध्दा मिळते. गरीब गुन्हेगारांना या सवलती मिळत नाहीत.

या विचारसरणीमुळे समाजातले गरीब लोक शक्ती मिलमधल्या बलात्काराच्या आरोपीबद्दलसुध्दा सहानुभूती बाळगून असतात आणि अशा वर्गाची मते हवी असतील तर आपणही अशा गुन्हेगारांबद्दल सहानुभूतीची भावना बाळगली पाहिजे. हे मुलायमसिंग यादव यांच्यासारख्या नेत्यांना कळते. त्यांचा सारा हिशोब मतांचा असतो. त्यांचा निषेध करणार्‍यांना हे लक्षात येत नाही पण त्यांची अशी विधाने ही कॅलक्युलेटेड असतात. त्यांनी मागणी केली म्हणून या गुन्हेगारांची फाशीची शिक्षा काही रद्द होत नाही. ती त्यांना होतेच पण दरम्यान त्यांच्याविषयी सहानुभूती असणार्‍यांची मते मुलायमसिंग यादव यांच्यासारख्या नेत्यांना मिळून जातात. त्यांचा निषेध करणार्‍यांनी तो जरूर करावा पण मुलायमसिंग असे उद्गार उगाच काढत नसतात हे त्यांनी लक्षात ठेवावे.

Leave a Comment