मराठा समाजाला शिक्षण व नोकर्‍यात आरक्षण गोपीनाथ मुंडे यांचे आश्वासन

पुणे – ओबीसींच्या प्रस्थापित आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजासाठी शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण लागू करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पार्टीचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी दिले. राज्यात महायुतीला 35 जागांवर विजय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गोपीनाथ मुंडे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे अशी भाजपाची भूमिका आहे. ओबीसी समाजाच्या विद्यमान आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आपली भूमिका आहे. महायुती सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण देण्यात येईल. त्याविषयी शिवसेनेशी सहमती आहे; असेही ते म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन काँग्रेस आघाडीने निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. परंतु हे आरक्षण आणि अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याचे आश्वासन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने पाळले नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी राणे समितीचा अहवाल निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच आला तरीही राज्य सरकार गप्प बसले. त्यामुळे मराठा समाजाचे नेते विनायक मेटे महायुतीकडे आले; असेही मुंडे यांनी सांगितले.  ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नसल्याने ओबीसींमध्ये नाराजीचा प्रश्न उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

व्यापक महायुतीमुळे आठ टक्के जादा मते मिळतील. या निवडणुकीत उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात मोदी लाटेचा परिणाम जाणवेल. राज्यात महायुतीला 35 जागांवर विजय मिळेल. पश्चिम महाराष्ट्राचा पारंपरिक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाही यावेळी भुईसपाट करू; असा दावाही त्यांनी केला. 

राज्यातील जनतेमध्ये केंद्र सरकारबरोबरच काँग्रेस आघाडीच्या राज्य सरकारबद्दलही रोष असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळणार आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या पाठिंब्याची गरज पडणार नाही; असेही त्यांनी स्पष्त केले.

Leave a Comment