कोल्हापूर – भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे हृदयशून्य आणि संकुचित वृत्तीचे नेते असल्याने ते देशाचे पंतप्रधान बनण्यास पात्र नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जीतेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनी गुजरातमधून चारा आणि पशुखाद्याचे सहकार्य देण्यासाठी 22 हजार कोटी रुपयांची मागणी केली आणि ती रक्कम मिळेपर्यंत महाराष्ट्राला मदत दिली नाही. असा संकुचित मनाचा आणि हृदयशून्य माणूस भारतासारख्या विशाल देशाला कसे नेतृत्व देऊ शकेल्; असा सवाल आव्हाड यांनी केला. महाराष्ट्राने भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात गुजरातमधील आपद्ग्रस्तांना सर्वतोपरी मदत केली. मात्र मोदींना हा मनाचा मोठेपणा दाखविता आला नाही; असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात सुरुवातीपासून आघाडी घेतली असून राज्यात 35 ते 36 लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार निवडून येतील; असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. आघाडीच्या प्रचारासाठी राज्यात अनेक ठिकाणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संयुक्त सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गारपीट आणि अवकाळी पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतक-यांना सरकारने वेळेत चार हजार कोटी रुपयांची मदत पोहोचविल्याने शेतकरी समाधानी असल्याचा दावा करून; या नैसर्गिक संकटाचे विरोधकांनी राजकारण करू नये; असे आवाहनही आव्हाड यांनी केले. मोदींपेक्षा शरद पवार हेच पंचवीस वर्ष पंतप्रधान पद मिळावे म्हणून गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहेत; या भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विधानावर आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला.
पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. त्यांच्यासारखे आदरणीय नेते देशाचे पंतप्रधान झाल्यास आक्षेप घेण्यासारखे काही नाही; असे सांगतानाच मुंडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा वेजबाबदार विधानाची अपेक्षा नाही; असा टोलाही आव्हाड यांनी लगावला. कोकणातील सिंधुदुर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारास राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या नकाराच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक आहे; अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली. या प्रश्नाबाबत मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली असून नाराज राष्ट्रवादी कार्यकर्ते लवकरच प्रचारासाठी बाहेर पडतील; असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. \
विनायक मेटे हे महायुतीच्या वळचणीला जाऊन बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला काही फरक पडत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागेच आहे; असा दावाही आव्हाड यांनी केला.