भारतीय कंपन्यांनी पुरविले अमेरिकेला रोजगार

वॉशिग्टन – अमेरिकेत गुंतवणूक केलेल्या भारतीय कंपन्या अमेरिकेतील बेरोजगारी कमी करण्यास चांगलाच हातभार लावत असून या कंपन्यांनी अमेरिकेत आत्तापर्यंत ८१ हजारांहून अधिक जणांना नोकर्‍या दिल्या असल्याचे सीआयआयच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. भारतीय कंपन्या जागतिक बाजारात आपला ठसा उमटवित असतानाच जगातील सर्वाधिक शक्तीशाली देशात रोजगार देण्यातही महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत असे या सर्वेक्षणाच्या अहवालात म्हटले गेले आहे.

भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत १७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.२०१३ मध्ये अमेरिकेच्या ४० प्रांतात ६८ भारतीय कंपन्यांनी गुंतवणूक केली असून त्यात न्यूजर्सी, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, टेक्सास, इलिनॉईस या प्रांताचा समावेश आहे. अमेरिकन वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेत गुंतवणूक करणार्‍या परदेशी कंपन्यांच्या यादीत भारत पहिल्या दहा नंबरात आहे.