युसुफ गिलानींच्या मुलाच्या सुटकेस तालिबानचा नकार

इस्लामाबाद -पाकिस्तानचे माजी पंतप्रधान युसुफ रजा गिलानी आणि पंजाब चे दिवंगत गव्हर्नर सलमान तासीर यांच्या अपहृत मुलांची सुटका करण्यास  तहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटनेने नकार दिला असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानात दहशतवादी संघटना म्हणून बंदी असलेल्या या संघटनेत आणि पाक सरकार यांच्यात वझिरीस्थानातील अज्ञान स्थळी शांतता बोलणी सुरू आहेत.

या संघटनेचे दोन सदस्य सिध जेलमध्ये कैदेत आहेत. त्यांच्या सुटकेच्या बदल्यात तालिबान्यांनी पेशावर मधील इस्लामिया विद्यापीठाचे माजी कुलगुरू अजमलखान यांना सोडण्याची तयारी दाखविली आहे. ७ सप्टेंबर २०१० रोजी अजमल खान यांचे त्यांचा चालकासह बंदुकीच्या धाकावर विद्यापीठ परिसरातून अपहरण करण्यात आले आहे. पैकी चालकाला दोन वर्षांनंतर सोडून दिले गेले होते. पाकिस्तानात सुरू असलेला हिंसाचार थांबावा यासाठी सरकार आणि ही संघटना यांच्यात शांतता करारावर बोलणी सुरू आहेत मात्र सध्या तरी दोन्ही पक्षातील तेढ कायमच असल्याचे दिसून येत आहे असे समजते.