आरटीआय कार्यकर्ते विलास बारवकर यांची आत्महत्या, चिठ्ठीत वळसे-पाटलांचे नाव

पुणे- गेल्या काही वर्षात वेगाने औद्योगिककरण विस्तारणा-या चाकणमध्ये जमिनीसह अनेक बडे-बडे घोटाळे झाले आहेत. याचा पाठपुरावा करणारे चाकणमधील आरटीआय कार्यकर्ते विलास बारवकर यांचा आज सकाळी राहत्या घरात मृतदेह आढळून आला. बारवकर यांनी आत्महत्या केल्याचे पुढे येत आहे.  

सहकारी संस्था, अनिधकृत बांधकाम क्षेत्र, जमिनी खरेदी-विक्रीत मोठा घोटाळा झाल्याने बारवकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून त्याला तोंड फोडण्याचे काम केले होते. या घोटाळ्यात बडी धेंडी असल्याचे वारंवार पुढे आले होते. मात्र, राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या भागात बारवकर यांना धमक्या दिल्या जात होत्या. 

आत्महत्या करण्यापूर्वी बारवकर यांनी या घोटाळ्यातील काहींची नावे लिहली आहेत. स्टॅम्पपेपरवर चार पानी माहिती लिहून यात कोण-कोण आणि कसे घोटाळे केले याची माहिती दिली आहे. यात 52 जणांची नावे आहेत. त्यात विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्यासह पुणे जिल्ह्याचे माजी पोलिस अधिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या नावाचा उल्लेख केला आहे.