रामदास कदमांना प्रचारबंदी!

रायगड – आक्रमक भाषणांसाठी ओळखले जाणारे आणि सेनेच्या प्रत्येक दसरा मेळाव्यात सैनिकांच्या टाळ्या मिळवणारे सेना नेते रामदास कदम यांना लोकसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच तसे आदेश दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंत गीते यांनी केला आहे. त्यामुळे कोकणातील शिवसैनिक बुचकळ्यात पडले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेतेपद भूषवलेले रामदास कदम मागील विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. 

खासदार अनंत गीते यांनी आपल्या विरोधात काम केल्यामुळेच आपण पडल्याचा त्यांचा आरोप आहे. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांच्या आरोपाची दखल न घेतल्याने ते अस्वस्थ होते. या निवडणुकीत आपण गीतेंचा प्रचार करणार नसल्याचे कदम यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे कदम यांनी पक्ष नेतृत्वाला थेट आव्हान दिल्याची चर्चा होती. मात्र, उद्धव यांच्या आदेशानेच कदमांना प्रचारयादीतून वगळल्याचे सांगून गीतेंनी त्यांच्या बंडातील हवा काढून घेतली आहे. आता कदम नेमकी काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

रामदास कदम यांनी रायगड मतदारसंघात गीते यांची पुरती कोंडी करण्याची रणनीती आखल्याचे समजते. कदम यांचे भाऊ रमेश कदम हे शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर रायगड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मनसेनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. या हालचालींमुळेच सेनेचे नेतृत्व कदमांवर प्रचंड नाराज असल्याचे समजते.

Leave a Comment