‘निधर्मी’ कदमांनी साधला ‘मुहूर्त’

पुणे/ विशेष प्रतिनिधी – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने दि. २६ पेक्षा आजचा दि. २५ चा दिवस फलदायी आहे म्हणे! त्यामुळे कथित धार्मिक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर लोकसभा मतदार संघातील उमेदवार अनिल शिरोळे आणि प्रांतवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दीपक पायगुडे यांनी आपले उमेदवारी अर्ज या ‘शुभ’ दिवशी दाखल केले. मात्र आपण जातीयवाद निपटून काढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याची मुक्ताफ़ळे उधळणारे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार विश्वजीत कदम यांनी पूर्वी दि. २६ रोजी अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर करून देखील दि. २५ या ‘शुभ’ दिवसाचा मुहूर्त चुकविला नाही. इतर ‘मुहूर्तवादी’ उमेदवारांप्रमाणेच त्यांनीही उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधलाच!

कॉंग्रेस हा तत्वाने निधर्मी पक्ष आहे. काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विश्वजीत कदम हे तर नव्या तंत्रयुगात वावरणा-या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या भारती विद्यापीठाचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच देश विदेशात विस्तारलेला आहे. या माध्यमातून नवीन पिढी घडविण्याचे कार्यही कदम करीत आहेत. मात्र राहुल ब्रिगेडच्या तरुण, तडफदार शिलेदारांमध्ये समाविष्ट असूनही कदम यांच्या मनावरील परंपरांचा मागास, प्रतिगामी पगडा अद्याप कायम असल्याचे त्यांच्या मुहूर्त साधण्याच्या घाईमुळे स्पष्ट झाले आहे. विश्वजीत यांच्या प्रचारासाठी कॉंग्रेस पक्षाच्या अल्पसंख्य सेलद्वारे पुण्यातील ऐतिहासिक कॉंग्रेसभवनात सोमवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या भाडोत्री आणि आयात श्रोत्यांसमोर विश्वजीत यांनी निधर्मीवादाचे समर्थन करणारे जोशपूर्ण भाषण केले. 

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि भाजपाचे सहयोगी पक्ष यांच्यामुळे देशासमोर; प्रामुख्याने अल्पसंख्य समाजासमोर उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांचे केवढे मोठे आव्हान उभे राहिले आहे; याचे रसभरीत वर्णन त्यांनी आपल्या भाषणात केले. या धर्म, जातीयवादी राजकारणापासून मुक्तता मिळविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले. कदाचित हे खरे असेलही! मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुहूर्ताची वेळ आणि दिवस साधणारे कदम कितपत निधर्मी आहेत; असा सवाल राजकीय वर्तुळातच नव्हे; तर कॉंग्रेस पक्षात देखील केला जात आहे. आपल्या विचारसारणीचा प्रचारासाठी उपयोग करायचा असेल; तर विश्वजीत यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे भाग आहे.