मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या बीड लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले असून काका गोपीनाथ मुंडे यांना अडचणीत आणण्यासाठी त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी जोरदार कंबर कसली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील वंजारी मतांचीही विभागणी व्हावी यासाठी या मतदारसंघातून मनसेने वंजारी उमेदवार उभा करावा, असे प्रयत्न धनंजय मुंडे यांनी सुरू केले आहेत. शुक्रवारी त्यांनी राज ठाकरे यांची घेतलेली भेट हा याच रणनीतीचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याच मतदारसंघात गारपीटग्रस्त भागाचा पहिल्यांदा दौरा केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: सुप्रिया सुळे उपस्थित राहिल्या. बीड लोकसभा मतदारसंघाचा दौराही सुळे यांनी केला आणि आता या मतदारसंघातील वंजारी मतांचे विभाजन होण्यासाठी मनसेने येथे वंजारी उमेदवार द्यावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याचे बोलले जाते. अर्थात त्यांनी ही भेट राजकीय नसल्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला आहे.
बीड लोकसभा मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे भाजपचे उमेदवार आहेत. मागच्या निवडणुकीत विक्रमतांनी ते विजयी झाले होते. या मतदारसंघात वंजारी, धनगर आणि मराठा मतांचे राजकारण चालते. येथील वंजारी आणि धनगर समाजाला सोबत घेण्यात मुंडे यांना चांगले यश आले आहे. म्हणूनच वंजारी मतांचे विभाजन करण्यासाठी येथे मनसेने उमेदवार द्यावा, असे प्रयत्न सुरू आहेत. मुंडेंचा पराभव करता आला नाही, तरी त्यांना महाराष्ट्रात इतर कुठे फिरता येऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे.