भवानीनगर- समोरून आलेल्या दुचाकीचा धक्का लागल्याने शेजारून जाणाऱ्या टेम्पोखाली चिरडून दुचाकीवरील एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाले; तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार मृतांमध्ये एका बालकाचा समावेश आहे. हा विचित्र अपघात आज (गुरुवारी) संध्याकाळी सात वाजता इंदापूर बारामती रस्त्यावरील सणसरनजिक घडला. या अपघातात आई, मुलगी, जावई व नातू असे एकाच कुटुंबातील दगावल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत होती. या घटनेत नामदेव अभिमान माने (वय 40), अलका नामदेव माने (वय 35) व मयूर नामदेव माने (वय 7 वर्षे तिघेही रा. मूळ परांडा जि. उस्मानाबाद, सध्या रा. कल्याणीनगर, बारामती. ता. बारामती) या पतीपत्नी व मुलाचा जागीच मृत्यू झाला.
सुंदराबाई सुरेश जाधव (वय 50 रा. तरंगवाडी, ता. इंदापूर) याही या घटनेत गंभीर जखमी झाल्या होत्या, त्यांना उपचारासाठी बारामतीतील अनुचंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यातील सुंदराबाई या सणसरमधील बाळासाहेब माने यांच्या भगिनी होत. हे चौघेही सणसर येथे नातेवाईकांकडे चहापाणी करून बारामतीकडे एकाच दुचाकीवरून (एमएच42- सीसी-3239) निघाले होते. बारामतीकडे निघाले असतानाच सणसरपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावरील जगदंबा हॉटेलनजिक समोरून आलेल्या व इंदापूर बाजूकडे निघालेल्या दुचाकीने माने यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्या धक्क्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून माने यांच्यासह दुचाकीवरील चारही जण शेजारून चाललेल्या टेम्पोखाली (एमएच 42बी 7884) सापडले. टेम्पोच्या चाकाखाली सापडल्याने माने कुटुंबातील तिघेही जागीच ठार झाले.
अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, तिघाजणांचे मृतदेह अक्षरशः ओळखण्यापलीकडे गेले होते. सुंदराबाई यांच्या पायावरून टेम्पोचे चाक गेले होते. मात्र त्या जखमी होत्या, त्यांची हालचाल लक्षात घेऊन सणसर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेत तातडीने त्यांना बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले. परंतू तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेनंतर रस्त्यावर बघ्यांची प्रचंड गर्दी झाली. वालचंदनगर व भवानीनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन मृतदेह हलविले व वाहतूक सुरळीत केली. या घटनेत लहान मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली होती. या घटनेत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.