निरुपायापोटी स्त्री स्वातंत्र्य

दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराने स्त्रियांवरील अत्याचाराचा विषय ऐरणीवर आला. या निमित्ताने दिल्लीत तर सारी तरुणाई रस्त्यावर आली. बलात्कार करणार्‍यांना अधिक कडक शिक्षा देण्याची तरतूद असणारा कायदा करावा अशी मागणी जोर धरायला लागली. शेवटी केंद्र सरकारला ही मागणी मान्य करावी लागली. बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद असलेला नवा कायदा करण्यात आला. या घटनेमधून दोन चांगल्या गोष्टी पुढे आल्या. पहिली म्हणजे महिला आता निमूटपणे अत्याचार सहन करत नाहीत आणि दुसरी म्हणजे या महिला जागृतीची दखल समाजाला घ्यावी लागत आहे. एका भारतीय महिलेने तर लंडनमध्ये जाऊन तिथल्या श्रीमंत महिलांच्या नावात आपल्या नावाची नोंद केली. परवीन वारसी हे तिचे नाव. परवीन वारसी हिला ब्रिटनच्या उद्योग विश्‍वात सामोसा क्विन असे म्हटले जाते. कारण तिने आपला खाद्य उद्योग समोसे विकण्यापासून सुरू केला आहे. या उद्योगात तेराशे लोक कामाला आहेत आणि तिची वर्षाची उलाढाल १० कोटी पौंड एवढी आहे. आज महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कामगिरीवर नजर टाकली असता असे अभिमानास्पद चित्र दिसते. सध्या महिलांच्या दुरवस्थेवर चर्चा होत आहे पण काही वेळा सकारात्मक चित्रही पहावेसे वाटते. महिलांची आजची परिस्थिती पाहिली म्हणजे आपले मन दीड-दोनशे वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी तुलना करायला लागते. त्या काळात महिलांना कसलेच स्वातंत्र्य नव्हते. शिकण्याचा हक्क नव्हता आणि पुरुषांसमोर उभे राहून बोलण्याची त्यांना परवानगी नव्हती.

आज काळ बदललेला आहे. महिला आघाडीवर आहेत. कोणी तरी प्रयत्न केले म्हणून हे परिवर्तन घडले. अनेक धाडसी महिलांनी आणि त्यांना प्रोत्साहन देणार्‍या पुरुषांनी स्त्री-पुरुष समानतेचा विचार मांडला. लोकांनी त्यांचा छळ केला, त्यांना बहिष्कृत केले. अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. परंतु अशा संकटासमोर न डगमगता या समाज सुधारकांनी आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले आणि त्याचीच ङ्गळे आता आपण चाखत आहोत. आज महिला शिकत आहेत, पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात कार्यरत झालेल्या आहेत. एवढेच नव्हे तर काही क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांपेक्षा आघाडीवर आहेत. समाजातल्या पुरुषांनी स्त्रीयांचे घराबाहेर पडणे मान्य केले आहे. पण ही मान्यता मनापासून दिलेली आहे का? हा प्रश्‍न मोठाच अस्वस्थ करणारा आहे. आपल्या समाजाच्या एका वेगळ्या परिस्थितीचे दर्शन या प्रश्‍नाच्या उत्तरात दडलेले आहे. समाजातल्या पुरुषांनी स्त्रीयांना आपल्या बरोबरचे मानून स्वातंत्र्य दिलेले आहे की, निरुपाय म्हणून दिलेले आहे हा तो प्रश्‍न आहे. एखादा पुरुष आपल्या पत्नीला नोकरी करण्याची अनुमती देतो. ही काय समानता आहे का ? स्त्रीने पुरषाला अशी अनुमती दिलेली असते का ? पुरषाने नोकरी करताना घरातल्या स्त्रीची अनुमती घ्यावी असे कोणी म्हणते का? मग स्त्रीलाच अनुमतीची गरज का भासावी ? बरे दिलेली ही अनुमती तरी स्त्री स्वातंत्र्याच्या भावनेतून दिलेली असते का ? खरे तर नाइलाजाने दिलेली असते.

एकाच्या पगारात घर भागत नाही म्हणून तिला कामाला लावलेले असते. म्हणूनच नोकरी केली तरी तिच्या मागची घरकामे किंचितही कमी होत नाहीत. सर्वसाधारणत: सर्वच सुधारणांच्या बाबतीत ही मनोवृत्ती दिसत असते. नाईलाज म्हणून स्वीकारलेल्या समाजसुधारणा नेहमीच अर्धवट असतात. बायकोला नोकरीवर पाठवून स्त्रीला स्वातंत्र्य दिल्याचा आव आणणारा नरपुंगव प्रत्यक्षात मात्र स्त्रीला कमीच लेखत असतो. नवरा-बायको दोघेही नोकरी करत असतात. परंतु नवरा नोकरीशिवाय काहीच करत नाही. बायको मात्र नोकरीही करते आणि घरची कामेही करते. तिला स्वातंत्र्य दिल्याचा आव आणणारा तिचा नवरा आपली बायको नोकरी करत आहे, तेव्हा आपण तिच्याबरोबर स्वयपाकही केला पाहिजे असे चुकून सुद्धा म्हणत नाही. स्वयपाक तर लांबच राहिला, परंतु घरकामातला एखादा चमचा इकडून तिकडे करणे एवढे साधे काम सुद्धा तो टाळतो. असे एखादे घरचे काम केले तर आपल्या मर्दपणाला बाधा येईल, अशी भीती त्याला वाटत असते. म्हणजे बायकोला नोकरीवर सोडणारा नवरा समतेचा विचार करून बायकोला स्वातंत्र्य देत नसतो, तर घरात डबल उत्पन्न यावे म्हणून देत असतो. मनातून मात्र तो बायकोला दुय्यमच लेखत असतो. ही प्रवृत्ती केवळ मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय अशाच लोकांत आहे असे नाही, तर आय.ए.एस. अधिकार्‍यांच्या घरात सुद्धा अशीच अवस्था आहे. आपण स्त्री ही पुरुषांच्या बरोबरीची असते हा विचार मनापासून स्वीकारलेला नाही.

तसा तो स्वीकारलेला नसल्यामुळे घराच्या बाहेर पडलेली स्त्री घराबाहेर सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढायला लागली आहेत. पोलीस एवढे सावध झाले, समाज जागृत झाला, कायदा कडक झाला, पोलीस सजग झाले पण तरी सुद्धा महिला अजून असुरक्षितच आहेत. कारण हा प्रश्‍न मनोवृत्तीतून निर्माण झाला आहे. जोपर्यंत मनोवृत्तीत ङ्गरक पडत नाही, तोपर्यंत महिला सुरक्षित होणार नाहीत. महिला सुरक्षिततेचा विषय असो की महिलांची कोणतीही समस्या असो ती पुरुषी मनोवृत्तीतून निर्माण झालेली आहे. म्हणून स्त्रीयांना समता आणि स्वातंत्र्य पाहिजे असेल तर पुरुषांचा वर्चस्वाचा अहंगंड कमी झाला पाहिजे. परंतु तो कमी होत नाही. महिला दिन पाळला जातो, पण मानसिकता बदलत नाही.

Leave a Comment