
मुंबई- ज्या आरएसएसवाल्यांनी महात्मा गांधींची हत्या केली, तेच आज मतांसाठी गांधीजींचे गुणगान गात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेसचे नेते होते, तेही आपलेच असल्याचा देखावा भाजपवाले करीत आहेत. यांची विचारसरणी देशासाठी घातक आहे, असा थेट हल्ला चढवत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भिवंडी येथील सभेत संघ आणि भाजपची लक्तरे चव्हाट्यावर मांडली. राजीव गांधी यांनी भारतात संगणक आणला तेव्हा विरोध करणारे हेच लोक संगणक आम्हीच आणला, असे सांगत आहेत. उद्या अन्न सुरक्षा योजना आणि माहितीचा अधिकारही आम्हीच आणला, असे सांगायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा सणसणीत टोला विरोधकांना लगावतानाच, काँग्रेस हा केवळ पक्ष नाही तर सर्वाना सोबत घेऊन जाणारी ती एक विचारधारा आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौ-यावर आलेल्या राहुल गांधी यांची भव्य सभा भिवंडी येथे झाली. आपल्या तडाखेबंद भाषणात त्यांनी भाजपच्या व्यक्तिकेंद्रित नेतृत्वावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले, आमच्या विरोधकांकडे विचार नाहीत. ते फक्त हिंदु-मुसलमान यांना एकमेकांच्या विरोधात लढवितात, जातीजातीत भांडणे लावतात. त्यांच्याकडे स्वत:चा विचार नाही. निवडणुका आल्या की त्यांना परदेशातून विचार आयात करावा लागतो. काँग्रेसची विचारधारा या मातीतली आहे. हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा, सम्राट अशोकांचा, महात्मा गांधींचा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा विचार आहे. सर्वाना बरोबर घेऊन चालणारी अशी ही विचारधारा आहे. मतांसाठी आता सारे आमचेच, म्हणत श्रेय घेऊ पाहणा-या विरोधकांकडे स्वत:चा विचार नाही.
काँग्रेसचे विचार आणि योजना या आपल्याच असल्याचे ही मंडळी सांगू लागली आहेत. राजीव गांधी यांनी ज्यावेळी या देशात संगणक आणला तेव्हा याच लोकांनी विरोध केला. संसदेत चर्चा झाली तेव्हा त्यावेळचे सर्वात बुजुर्ग असणारे भाजपचे नेते म्हणाले होते की, संगणक देशात आला तर इथल्या तरुणांना रोजगार मिळणार नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. परंतु राजीव गांधी यांनी मोठय़ा धाडसाने संगणकीय क्रांती घडवून आणली. त्यातून देशाची झालेली प्रगती आपण पाहतो आहोत. आज ही प्रगती पाहिल्यानंतर विरोधक आपणच देशात संगणक आणला, असे छातीठोकपणे सांगत आहेत. उद्या अन्न सुरक्षा योजना, माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना आम्हीच आणली, असे सांगण्यासाठीसुद्धा हे लोक कमी करणार नाहीत. या देशाला कोणतीही एक व्यक्ती पुढे घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही कधीही एकटय़ाने या देशाचा विकास केला, असे म्हणत नाही. या देशाचा विकास जर कोणी केला असेल तर तो या देशातल्या कष्टकरी, कामगारांनी केला आहे.
हिंदू, मुस्लीम, कोळी, आगरी, कुणबी बांधवांनी केला आहे. आम्ही कष्टकरी, गरीब जनतेबद्दलचे विचार मांडतो आहोत. त्यांचे विचार काय आहेत? इंडिया शायनिंग! ते श्रीमंतीची भाषा बोलतात आणि आम्ही गरिबीची भाषा बोलतोय. सत्ता मिळाल्यास तीन महिन्यांत बदल घडवून आणू, असे ते सांगतात, तर आम्ही सर्वाना बरोबर घेऊन देश घडविण्याचा विचार मांडतोय, असे सांगून राहुल गांधी यांनी युपीए सरकारने आणलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला.