निवडणूक लढविण्यास विजय भटकर यांचा नकार

पुणे- आगामी काळात होत असलेली लोकसभा निवडणूक लढविणे हे माझे काम नाही. ते माझे क्षेत्र नाही. त्या‍मुळे मी निवडणूक लढविणार नाही ही माझी भूमिका भाजपच्या श्रेष्ठींना कळविली असल्याचे ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष पुण्यातून १०० टक्के यश मिळवून देईल, अशा उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा होती. त्यात पक्षाने ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ आणि परम सुपरकम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांच्याकडे विचारणा केल्याची बातमीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना डॉ. भटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

गटातटात विभागलेल्या शहर भाजपमधून शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि आमदार गिरीश बापट यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. त्याचबरोबर माजी खासदार प्रदीप रावत आणि खासदार व पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांच्याही नावांची चर्चा पक्षात आहे; परंतु यापैकी कोणीही निवडून येईल, याची खात्री पक्षाला वाटत नव्हती. त्यामुळेच पुण्याची जागा खात्रीपूर्वक मिळवून देऊ शकेल, अशा उमेदवाराचा शोध पक्षाकडून सुरू होता. आयटी सिटी अशी ओळख असलेल्या पुण्यात डॉ. भटकर यांच्यासारखा उमेदवार दिल्यास पुणेकरांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल, या अपेक्षेने पक्षातर्फे त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र भटकर यांनी नकार कळविल्याने त्यामुळे आता अनिल शिरोळे आणि गिरीश बापट यांच्यातच खरी चुरस असल्याचे स्पष्ट झाले आहे.