सायना नेहवालची विजयी सलामी

लंडन- अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने सज्ज झालेल्या सायना नेहवालने या स्पर्धेत विजयी मालिका सुरु ठेवत तिने पहिल्याच सामन्यात विजय मिळविला आहे. तिने सातव्या मानांकित सायनाने स्कॉटलंडच्या किरस्टी गिलमूरवर २१-१५, २१-६ असा विजय मिळवला.

या स्पर्धेत सायना नेहवालने एकीकडे अभियानाची विजयाने सुरुवात केली, मात्र पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यासह ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान सलामीच्या लढतीतच संपुष्टात आले आहे. महिन्याभराच्या विश्रांतीनंतर तंदुरुस्त सायनाने पहिल्या गेममध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. दमदार स्मॅशेस आणि प्रदीर्घ रॅलींवर भर देत सायनाने ही आघाडी ११-७ अशी वाढवली. नेटजवळून सुरेख खेळ करताना सायनाने ही आघाडी वाढवत पहिला गेम नावावर केला. दुस-या गेममध्ये सायनाने अफलातून खेळ करत ११-३ अशी दमदार आघाडी घेतली.

दुस-या एका सामन्यात जपानच्या पाचव्या मानांकित केनिची टागोने कश्यपवर १४-२१, २१-१९, २१-१७ अशी मात केली. नेटजवळून सुरेख खेळ करत आणि शैलीदार फटक्यांच्या आधारे कश्यपने पहिला गेम नावावर केला, मात्र त्यानंतर टागोच्या आक्रमक खेळासमोर तो निष्प्रभ ठरला. जपानच्या केंटो मोमोटाने किदम्बी श्रीकांतवर २१-११, २१-१५ असा विजय मिळवला. चीनच्या जिन मा आणि युआटिंग तांगने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-१५, २१-१७ अशी मात केली. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा-तरुण कोना जोडीचाही पराभव झाला. डेन्मार्कच्या जोअॅ किम फिश्चर नेल्सन-ख्रिस्तियना पेडरसेन जोडीने अश्विनी-तरुण जोडीवर २१-१३, २१-१६ अशी मात केली.त्यामुळे सायना वगळता भारतीय संघातील इतर सर्व खेळाडूना पहिल्याच सामन्यात पॅकअप करावे लागले आहे.

Leave a Comment