पुणे – बॉलिवूड अभिनेता १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात येरवडा जेल मध्ये शिक्षा भोगत असून त्याच्या व त्याच्या मित्रांसमवेत काढून घेतलेल्या फोटोमुळे अधीक्षक योगेश देसाई आणि जेल अधिकारी चंद्रकांत आवळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तुरूंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी या संदर्भात राज्य शासनाकडे अहवाल पाठविला त्यात या अधिकार्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे समजते.
सुमारे पाच महिन्यांपूर्वी येरवडा जेलमधील कैद्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यात संजय नाटकात काम करत होता. त्यावेळी त्याचे मित्र दिग्दर्शक राजकुमार हिरानी, मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांना तुरूंगात बोलावले गेले होते. त्यावेळी देसाई आणि आवळे या दोन अधिकार्यानी संजय दत्त व त्याच्या मित्रांसमवेत आपला फोटेा काढून घेतला होता. हा फोटो प्रसिद्धही झाला होता. जेल मधून बाहेर पडत असताना संजयबरोबर एका तुरूंग कर्मचार्याने हस्तांदोलन केले तर त्याला निलंबित केले गेले होते मग अधिकार्यासाठी वेगळा नियम का असा सवाल केला गेला होता.
जेलच्या नियमानुसार कोणतीही बाहेरची व्यक्ती तुरूंगात येण्यासाठी महानिरीक्षकांची परवानगी घ्यावी लागते. हा नियम यावेळी धाब्यावर बसविला गेला होता असेही समजते. त्यामुळे तुरूंग महानिरीक्षक बोरवणकर यांनी तपासाचे आदेश दिले होते. त्याचा अहवालही राज्य शासनाला सादर केला गेला आहे.