खेळाला राजकारण्यांपासून दूर ठेवा- राहुल गांधी

नवी दिल्ली – देशातील खेळाला राजकारण्यांपासून दूर ठेवावे आणि क्रीडा प्रतिनिधिंनी खेळामधील सहभाग वाढवावा असे आवाहन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. ‘राष्ट्रीय युवा धोरण २०१४’ आणि ‘राजीव गांधी खेल अभियाना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील खेळामध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू आणि क्रीडा प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले पाहिजे त्याचबरोबरखेळांमधील राजकीय व्यक्तींचा सहभाग सर्व प्रथम कमी केला पाहिजे. हेच धोरण राजकारणालाही लागू होते. जर तुम्हाला देशाच्या राजकारणात बदल हवा असेल तर युवा पिढीचा राजकारणातील सहभाग वाढला पाहिजे. देशाला सध्या सामान्य माणूस, युवा शक्तीची गरज आहे. त्यांच्यामुळेच देशाच्या राजकारणात बदल होऊ शकतो, असे राहुल यांनी यावेळी सांगितले. जवाहरलाल नेहरु मैदानात राष्ट्रीय युवा धोरण २०१४ आणि राजीव गांधी खेल अभियाना अंतर्गत काही योजनांचे अनावरण करण्यात आले. यावेळी क्रीडा मंत्री जितेंद्र सिंग, मेरी कोम, विजेंदर सिंग, पी गोपीचंद, अश्विनी नाचप्पा, रंजन सोढी आणि कर्णम मल्लेश्वरीही उपस्थित होते.

Leave a Comment