
ठाणे- ठाण्यातील खारेगाव येथील टोलनाक्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी तोडफोड केली. विशेष म्हणजे ही तोडफोड करताना पक्षाचे प्रमुख राज ठाकरे तेथे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी राज्यातील टोलविरोधात आंदोलन सुरु केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची झालेल्या बैठकीनंतर टोलविरोधी आंदोलन स्थगित केले होते. मात्र गुरुवारी अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी खारेगाव येथील टोल नाक्याची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावरील केबीन आणि संगणक फोडले आहेत. या टोलनाक्यावर पोलिस बंदोबस्त असताना ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
