‘ऊर्जा खात्यात हजारो कोटीचा घोटाळा’

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील ऊर्जा खात्यात २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र समन्वयक अंजली दमानिया यांनी गुरुवारी वार्ताहर बैठकीत केला. हा घोटाळा झाला नसता तर विजेचे दर ५० टक्यांपेक्षा कमी झाले असते, असा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘आप’चे महाराष्ट्राती​ल पदाधिकारी कमालीचे आक्रमक झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस हा आपचा सर्वात मोठा राजकीय शत्रू असेल, असे संकेत दमानिया यांनी अंधेरीतील पहिल्याच सभेत दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी ऊर्जा खात्यात महाकाय घोटाळा झाल्याचा आरोप केला.

विदर्भ, मराठवाडा व अन्य ठिकाणच्या औ​ष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी लागणाऱ्या कोळशाच्या व्यवहारात सुमारे १२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. वीज दर ​नक्की करण्यात महत्त्वाची भूमिका असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगास गेल्या चार वर्षापासून चेअरमन नाही. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे दमानिया यांचे म्हणणे आहे. राज्यातील विजेची गरज भागवण्यासाठी अन्य राज्यातून वीज खरेदी होते. अशा खरेदी करारात गडबड असल्याचा आरोप करून, वी​ज निर्मिती केंद्रातील कोळशात भेसळ केली जाते.

वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामाच्या नावाखाली झालेल्या भांडवली गुंतवणुकीतही १० हजार कोटींचा गैरव्यहार झाला असल्याचा दावा त्यांनी केला. याचा भार वीज ग्राहकांवर चढ्या वीज दराच्या रूपांत पडत असल्याचे ‘आप’चे म्हणणे आहे. शेजारी राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीज दर अत्यंत महागडे व जादा आहेत. परिणामी अन्य राज्यात उद्योगधंदे स्थलांतरित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर बेकार होण्याची वेळ एका अर्थाने याचा रोजगार निर्मितीवर थेट परिणाम झाल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment