मुंबई – मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राकेश मारिया यांची नियुक्ती होताच पोलिस दलातील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. आयपीएस अधिकारी जावेद अहमदही मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. त्यांनी जाहीरपणे माध्यमांसमोर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे असे जावेद अहमद यांनी म्हटल आहे. त्यांना महासमादेशक, गृहरक्षक दलपदी बढती देण्यात आली आहे. मुंबई पोलिस आयुक्तपदी निवड न झाल्यान तुम्ही राजीनामा देण्याचा विचार करत आहात का ? या प्रश्नावर त्यांनी कुठलेही स्पष्ट उत्तर दिले नाही. मला जे सांगायचे होते ते मी सांगितले असे उत्तर त्यांनी दिले. जावेद अहमद १९७९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ) होते.
मुंबई पोलिस आयुक्ताची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी जावेद अहमद आणि ठाण्याचे माजी पोलिस आयुक्त के.पी.रघुवंशी यांना बढती देण्यात आली. दुसरीकडे आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेले अतिरिक्त पोलिस महासंचालक विजय कांबळेही सरकारच्या निर्णयावर नाराज झाले आहेत. दरम्यान राकेश मारिया यांनी रविवारी मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. राकेश मारिया हे १९८१ च्या भारतीय पोलिस सेवेच्या तुकडीमधील अधिकारी आहेत. मारिया यांची सर्वप्रथम अकोला येथे सहाय्यक पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. १९८६ मध्ये ते मुंबईत आले.
१९९३ मध्ये पोलिस उपायुक्त (वाहतूक) म्हणून मारिया यांनी काम पाहिले होते. त्याचवेळेस मुंबईत झालेल्या बॉम्ब स्फोटाच्या तपासाची जबाबदारी मारिया यांच्याकडे देण्यात आली. या साखळी बॉम्बस्फोटाच्या कटाचा उलगडा करण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यानंतर झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा तपास अतिशय जलदगतीने करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्यानंतर पोलिस उपायुक्त (गुन्हे) आणि सहआयुक्त (गुन्हे) आदी पदांवर मारिया यांनी काम पाहिले होते.