‘आप’चे मुंबईतील उमेदवार जाहीर, मीरा सन्याल व मयांक गांधींना उमेदवारी

मुंबई- लोकसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील दोन जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. उत्तर पश्चिम मुंबईतून मयांक गांधी तर, दक्षिण मुंबईतून मीरा सन्याल यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. मयांक गांधी आता काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत यांना आव्हान देतील, तर सन्याल केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्याविरोधात लढतील. दुसरीकडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे समजते.

मात्र त्या कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याबाबत स्पष्ट झाले नाही. असे असले तरी त्या ‘आप’ च्या तिकीटावर निवडणूक लढतील असे संकेत मिळत आहेत. येत्या 4-5 दिवसात पाटकर कोणत्या पक्षाकडून व कोठून लढणार हे स्पष्ट होईल. उत्तर पश्चिम मुंबईतून सध्या काँग्रेसचे हेवीवेट नेते गुरुदास कामत खासदार आहेत. तेथे मयांक गांधींना उमेदवारी देऊन आपने काँग्रेसवर कुरघोडी केली आहे. मेधा पाटकरही लोकसभा निवडणूक लढविणार, पक्ष व लोकसभा मतदारसंघ 4-5 दिवसात स्पष्ट होईल. त्या आपच्या तिकीटावरच लोकसभा निवडणूक लढविताल असे सांगितले जात आहे. मागील महिन्यात त्यांनी आपल्या जनआंदोलन संघटनेचा पाठिंबा आपला जाहीर केला होता. त्यामुळे त्या आपच्या तिकीटावर निवडणूक लढवतील असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.