ममतांना अण्णा भेटणार

नगर – तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत भेट होणार आहे. हजारे यांच्या १७ मुद्यांवर तृणमूल काँग्रेसने सकारात्मक विचार केला असून त्याच्या अंमलबजावणीची हमी देण्यास तयार असल्याचेही पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेऊन सांगितले. बॅनर्जी यांनीही यावेळी हजारे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यामुळे हजारे यांचा बॅनर्जी यांना पाठिंबा आता निश्चित झाला आहे.

हजारे यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून १७ मुद्यांवर त्यांचे काय मत आहे, अशी विचारणा केली होती. या पत्राला आतापर्यंत केवळ ममता बॅनर्जी यांच्याकडूनच उत्तर आले. हजारे यांचे १७ मुद्दे मान्य असून त्यांचा समावेश आपल्या निवडणूक जाहिरनाम्यात करीत असल्याचे आणि अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी कळविले. यावर प्रतिक्रिया देताना गेल्या आठवड्यात हजारे यांनी ममतांचे कौतुक करून त्या आपल्याला पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार वाटत असल्याचे म्हटले होते. त्यांनी या १७ मुद्द्यांसंबंधी हमीपत्र दिले तर पाठिंबा देण्यासंबंधी विचार करू, असेही हजारे म्हणाले होते.

या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस मुकूल रॉय यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडाळाने आज राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. सतरा मुद्यांवर हमीपत्र देण्याची तयारी असल्याचा ममता यांचा संदेश त्यांनी आणला होता. ममता बॅनर्जींनी भ्रष्टाचारविरोधात कठोर कायदे बनवण्याबरोबरच ग्रामकेंद्रीत सामाजिक-आर्थिक विकासाचे कार्यक्रम ग्रामकेंद्रीत आर्थिक विकास, जमीन अधिग्रहणात पारदर्शकता आणण्याचे काम सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली. ‘सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे अभिनंदन करतो. ममता बॅनर्जींचाही नेहमी सार्वजनिक जीवनात पारदर्शकेतवर भर दिला आहे,’ असेही रॉय यांनी हजारे यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी व हजारे यांचा दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. ममता यांनी हजारे यांना प्रत्यक्ष भेटण्याची तयारी दर्शविली. १८ फेब्रुवारीला हजारे दिल्लीला जाणार आहेत. तेथेच भेट घेण्याचे ठरविण्यात आले. यावेळी संतोष भारती, दत्ता आवारी आणि हजारे यांचे अन्य सहकारी उपस्थित होते.