२२ टोलनाके बंद होणार

मुंबई -टोलच्या मुद्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे, प्रसारमाध्यमांचे संपादक आणि मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांच्यामध्ये शुक्रवारी सकारात्मक चर्चा झाली. सहयाद्री अतिथीगृहावर ही बैठक झाली. जवळपास अडीचतास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी टोलवसूलीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे आश्वासन दिले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी दहा कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च झालेल्या प्रकल्पांवरील टोल वसूली बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्यातील २२ टोलनाके बंद होणार आहेत.

अपूर्ण प्रकल्पांवरील टोलवसूली रद्द करण्यात आली आहे तसेच यापुढे महामार्गावरील रस्ते वाहतूकीत आरटीओच्या नियमांचे कठोर पालन करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. अचारसंहितेपूर्वी पूर्वलक्ष्यी प्रभावाने सरकारकडून नवे टोल धोरण जाहीर करण्यात येणार आहे. थोडयाच वेळात राज ठाकरे स्वत: पत्रकारपरिषद घेऊन काय चर्चा झाली याची माहिती देणार आहेत. मनसेच्या अपेक्षित परिणाम साधू न शकलेल्या टोल विरोधातील रास्ता रोको आंदोलनानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये आज सहयाद्री अतिथीगृहावर चर्चा झाली.

ही चर्चा पारदर्शक असावी तसेच या चर्चेनंतर कुठलेही तोडपानीचे आरोप होऊ नयेत यासाठी राज यांच्यासोबत काही मोजके संपादकही या चर्चेत सहभागी झाले आहेत. टोल विरोधात मनसेने बुधवारी संपूर्ण राज्यात केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा फज्जा उडाला होता. त्यामुळे आजची बैठक मनसेसाठी महत्वाची होती. कारण आपल्याला आश्वासन नको ठोस निर्णय हवा असे राज यांनी आधीच जाहीर केले आहे. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवूनही तयार न झालेले राज ठाकरे काल अचानक चर्चेसाठी कसे काय तयार झाले याविषयी उलट-सुलट चर्चा सुरु आहे.