मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल, मुंबई-अहमदाबाद विमानाला लक्ष्य करणार, तपास सुरू


मुंबई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहराला हादरवून सोडणारी धमक्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही आहे. शनिवारी रात्री मुंबई विमानतळाला धमकीचा ई-मेलही आला होता. या ईमेलनुसार विमानतळावर इंडिगो फ्लाइट 6E6045 मध्ये बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली होती. ही माहिती मिळताच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवर मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या विमानाची सखोल झडती घेण्यात आली. मात्र तपासादरम्यान यंत्रणांना काही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर रात्री उशिरा विमान रवाना करण्यात आले. पोलिसांनी धमकीचा ईमेल गांभीर्याने घेतला असून या संदर्भात तपास सुरू केला आहे.

यापूर्वी देखील मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षालाही व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश आले होते. त्यादरम्यान दहशतवादी मुंबईत घुसल्याचेही संदेशात म्हटले होते. ज्यात ते गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करतील. हा व्हॉट्सअॅप मेसेज गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर याप्रकरणी एका व्यक्तीला अटकही करण्यात आली होती.

रायगडमध्ये सापडली संशयास्पद बोट
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातही काही दिवसांपूर्वी समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्या होत्या. आतमध्ये जिलेटिनच्या काड्याही सापडल्या. ही बोट मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला. मात्र, ही बोट कोणाची आहे आणि ती रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर कशी पोहोचली, हे तपासाअंती निष्पन्न झाले.