विनाअनुदानित गॅस सिलिंडर 107 रूपयांनी स्वस्त; डिझेल मात्र महागले

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशातील जनतेला आणखी एक दिलासा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात 107 रूपयांनी कपात केली आहे. मात्र, डिझेलच्या दरात प्रतिलीटर 50 पैशांने वाढ केली आहे.

नवे दर आज (शुक्रवार) मध्यरात्रीपासून लागू करण्‍यात येणार आहेत. पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलिंडरची संख्या 9 वरुन 12 करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सिलिंडर वाढवण्याची मागणी तत्काळ मान्य करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे घरगुती वापराच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यात आले आहे. ग्राहकांना आता वर्षाकाठी अनुदानित 12 सिलिंडर मिळणार आहेत. त्यामुळे 13 वे सिलिंडर बाजार मुल्यानुसार खरेदी करावे लागणार आहे.

दिल्लीत डिझेलच्या दरात प्रति लीटर सर्व करसहीत 57 पैशांनी वाढ झाली आहे. आता 54.91 रूपये प्रति लीटर डिझेल मिळेल. तर मुंबईत डिझेलच्या दरात वाढ होऊन ते प्रति लीटर 63.23 रूपये झाले आहे.