हिर्‍यांच्या व्यापारातून मनी लॉंडरिंग

पॅरिस – भारतातल्या हिर्‍यांच्या व्यापारातला पैसा मोठ्या प्रमाणावर मनी लॉंडरिंगच्या व्यवहारात वापरला जात असल्याचे एका आंतरराष्ट्रीय पाहणीत आढळून आले आहे. मनी लॉंडरिंग आणि दहशतवाद्यांना दिला जाणारा पैसा यांच्या संबंधाने ही पाहणी करण्यात आली होती. मनी लॉंडरिंगच्या व्यवहारात असा बेकायदा पैसा वापरला जाणार्‍या पहिल्या पाच देशात भारताचा समावेश होत असल्याचे या पाहणीत आढळले आहे.

पॅरिस मध्ये कार्यालय असलेल्या फिनान्शीयल ऍक्शन टास्क फोर्स या संघटनेने हिर्‍यांच्या व्यापारातील आर्थिक उलाढालींचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला असून गेल्या शुक्रवारी तो जाहीर केला आहे. हिर्‍यांच्या किंमती ठरवताना त्या प्रमाणापेक्षा अधिक दाखवल्या जातात आणि वरचा पैसा गैर मार्गाने गुंतवला जातो. किंवा त्याचा संशयास्पद व्यवहारात विनियोग होतो असे या पाहणीत आढळले आहे.

या मार्गाने करोडो डॉलर्स संशयास्पद व्यवहारात येत असल्याचा आणि ते पैसे जगातल्या काही दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याचाही निष्कर्ष या पाहणीतून काढण्यात आला आहे. या व्यवहारात मुंबई आणि सूरत या शहरातले काही हिरे व्यापारी गुंतले असल्याचा या पाहणीचा संशय आहे.